पान:साथ (Sath).pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आयुष्यात काहीतरी नाटय निर्माण करण्यासाठी."
 " राम, ती नक्की असा अगदी विचार करून मुद्दाम हे करते असं मला नाही वाटत."
 " पण हा मेलोड्रामा तुलाही आवडत नाही ना?"
  " नाही."
 " मग आपण हया दुखवटयाच्या भेटीच थांबवू. लोकांना सांगू डॉक्टरांनी त्यांना कुणाला भेटू देऊ नका म्हणून सांगितलंय."
 " असं कसं आपण करू शकू ? एवढया लहानशा घरात कुणाला बाहेरच्या बाहेर घालवून द्यायला जमणार नाही. आणि तिला ते मुळीच आवडणार नाही."
 " मग त्यांना शिरगावला घेऊन जाऊ."
  " राम, तुला माहीताय श्राद्ध झाल्याशिवाय ती इथून हलणार नाही."
 " मग मी आपला जातो. मला हा तमाशा असहय होतोय."
 "तू दुर्लक्ष का करीत नाहीस तिच्याकडे ?"
  " ते कसं शक्य आहे ?"
 " मग जा तर तू."
 " अशा प्रसंगात तुला एकटं सोडून जायला खरं म्हणजे माझं मन घेत नाहीये-"
 " माझी काळजी करू नको. माझं मी बघून घ्यायला समर्थ आहे. तुला इथं राहणं सहन होत नाहीये ना? मग तू जा."
 ज्योतीला थोडासा राग आला, पण तो गेल्यावर एकूण तिला हायसं वाटलं. म्हणजे आता आई आणि नवरा यांच्या कात्रीत सापडायला नको. पण तिचं मनावरचं ओझं उतरलंसं वाटणं अल्पकाळच टिकलं. एक दिवस तिच्या आईचं नाटक (आता ज्योतीही स्वतःशी हाच शब्द वापरायला लागली होती) जरा अतीच झालं. आलेली माणसं चमकली. ज्योतीलाही लाजल्यासारखं झालं. माणसं निघून गेल्यावर तिनं आईला समजावण्याचा प्रयत्न करण्याची घोडचूक केली. " आई, तुझं दुःख मी समजू शकते, पण किती दिवस तू हा असा आक्रोश करणार आहेस ? काही झालं

साथ : ७५