पान:साथ (Sath).pdf/81

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देण्याबद्दल बोलणं बास "
 पुढे पुढे तिला कळलं की रामला मरण ह्या विषयावर बोललेलं मुळीच आवडत नसे. तिला याचं जरा आश्चर्यच वाटलं होतं. कारण खेड्यातल्या लोकांना तिनं कुणाच्याही मृत्यूबद्दल अगदी बीभत्स तपशीलात शिरून चर्वितचर्वण करताना ऐकलं होतं. रामचा ह्या विषयाबद्दलचा तिटकारा हा एकूणच आजार, अपघात, मृत्यू हे जीवनाचे अविभाज्य अंग आहेत ह्या सत्याचा अस्वीकार होता. अशा प्रसंगांना सामोरं जाण्याऐवजी त्यांच्याकडे पाठ फिरवून त्यांचं अस्तित्व तो पुसून टाकायला पाही. अशाच एका प्रसंगातून तो आणि ज्योतीची आई ह्यांच्यात कायमचा दुरावा निर्माण झाला.
 प्रसंग होता ज्योतीच्या वडिलांच्या मृत्यूचा. तशी मृत्यूच्या बातमीने धक्का बसण्यासारखी परिस्थिती नव्हती, कारण बरीच वर्षं ते विकलांग अवस्थेत अंथरुणावर पडून होते, आणि इतरांशी त्यांचा संबंध फारच मर्यादित होता. भरवलेलं अन्न गिळण्याची क्रिया आणि घशातून एक चमत्कारिक घुरघुरणारा आवाज एवढया दोनच गोष्टी ते अजून माणसांत असल्याची साक्ष देत असत. त्यांचे डोळे संपूर्ण भावहीन होते. त्यांत समोरच्या माणसाला ओळखल्याची. तो काय बोलतो आहे ते कळल्याची चमक कधीच दिसत नसे.
 अंत्यसंस्कारांनंतरच्या दिवसांत लोक दुखवटयाच्या भेटीला यायचे. मेलेला माणूस कसा सर्व सद्गुणांचा पुतळा होता. प्रत्येक बोलणाऱ्या व्यक्तीशी त्याचं कसं खास नातं होतं हे गंभीर चेहरा, पाणावलेले डोळे यांसहित म्हणून झालं की त्यांच्या शेवटच्या आजाराची तपशीलवार चर्चा व्हायची, आणि इतका दीर्घ काळ त्यांची इतक्या मनोभावे सेवा करणाऱ्या बायकोची श्रेष्ठता कौतुकानं उल्लेखली जायची. हया सगळ्याचं पुन्हापुन्हा दळलेलं दळण रामइतकंच ज्योतीलाही कंटाळवाणं झालं होतं. पण अटळ प्रसंगाला स्थितप्रज्ञपणे तोंड देण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. तो दगडासारखा चेहरा करून शून्यात नजर लावून बसायचा नि नंतर

साथ: ७३