Jump to content

पान:साथ (Sath).pdf/8

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

झटकून टाकल्यासारखी तिनं किंचित मान हलवली. ती इथली राहिली नाही, असं म्हणणं खरं म्हणजे अचूक नव्हतं. कारण खऱ्या अर्थाने ती इथली कधी झालीच नव्हती. ते दुसरं घर जसं तिनं सर्वांशानं आपलं म्हणून स्वीकारलं तसं हे स्वीकारलंच नाही. तिला हे आवडलं नव्हतं असं नव्हे. पण इथे ती तात्पुरती म्हणून आली न शेवटपर्यंत तशीच राहिली.
 त्या दुसऱ्या घराच्या समोर, कामाच्या मोठ्या थोरल्या व्यापातून वेळ काढून, तिने एक लहानशी बाग केली होती. त्यात हौसेनं कर्दळ, शेवंती, जास्वंद, गुलाब लावले होते. बागेची निगा तीच राखायची. त्याची मशागत, छाटणी, खतपाणी आपल्या हाताने करायची. राम त्या बागेला तिचं तिसरं मूल म्हणे. ह्या ठिकाणी रहायला आल्यावर एकदा बाल्कनीत कुंडयांची बाग कर असं राम म्हणाला तेव्हा ती नुसतीच हसली होती.

 तो म्हणाला होता, "जमिनीत बाग लावणं वेगळं न हे वेगळं हे कबूल आहे मला पण काहीच नसण्यापेक्षा कुंडया बऱ्या की."
 आता तिला वाटलं की इथे बाग करण्याचे कष्ट घेण्याची तिची अनिच्छा प्रतीकात्मक होती. ह्या जागेबद्दलची तिची भावना त्यातनं प्रकट झाली होती. ही जागा बरड होती. वाढणाऱ्या गोष्टी आणि सुखावणाऱ्या आठवणी ह्यांची उपज नसलेली. आता ती ही जागा तर सोडून चाललीच होती, पण हिच्याबरोबर ती दुसरीही. त्या घरी ती पुन्हा कधीही जाणार नव्हती. ह्यात बाहेरून येऊन पाऊल टाकणारी तीच, आणि आता निघून जाणारीही तीच. हे रामचं घर, रामचं आयुष्य. ती फक्त काही काळ त्यात वाटेकरी होती. आपल्याला आपलं असं वेगळं आयुष्य उभारता येईल का, अशा शंकेनं ती व्याकुळ झाली. इतके दिवस ती रामचं आयुष्य जगली होती. त्याच्या आवडीनिवडी तिच्या झाल्या होत्या. त्याचे विचार, त्याची मतं ही खास ठरविल्याविना सहज उचलली जाऊन आमचे विचार, आमची मतं झाली होती.
  तिनं बाथरूममध्ये जाऊन सावकाश रेंगाळत कपडे बदलले, दात घासले, तोंड धुतलं. आता वेळ येऊन ठेपल्यावर रामशी

२:साथ