पान:साथ (Sath).pdf/7

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.


  शेवटचा पाहुणा बाहेर पडला तशी रामनं पुढचं दार लावून बोल्ट सरकवलेले ज्योतीला ऐकू आले. बैठकीची खोली सिगरेटचा धूर, दारू आणि माणसं यांच्या संमिश्र वासानं भरून गेली होती. त्याच्या शिसारीनं ज्योतीने ओठ मुडपले. त्यात समाधानाची बाब एवढीच की, अशा रात्रीनंतरच्या सकाळी ती आणि राम उठण्यापूर्वीच खोली पुन्हा निर्मळ, प्रसन्न करून ठेवण्याचं काम नामदेव आणि पार्वती चोखपणे बजावीत. इथे शहरातसुद्धा चोवीस तास घरात नोकर ठेवण्याचा रामचा अट्टाहास होता. त्यांच्यावर फार खर्च होतो, असं ज्योतीला वाटायचं. शिवाय फ्लॅटमध्ये सदैव त्यांचा वावर, लुडबूड कधीकधी नको वाटायची. तरीपण ती दोघं हाकेला ओ द्यायला कधीही तयार असण्याची सोयही होतीच.
 कॉरिडॉरमधून झोपायच्या खोलीकडे जाताना तिला एकदम जाणवलं की, आपण प्रत्येक गोष्टीकडे तिऱ्हाइताच्या अलिप्ततेनं पहातोयत. जणू आपण इथल्या राह्यलोच नाही. मग हा विचार

साथ: १