पान:साथ (Sath).pdf/9

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुकाबला करण्याचा क्षण ती शक्य तितक्या लांबणीवर टाकत होती. राम तिचं होईपर्यंत शांतपणे थांबेल, तिला घाई करणार नाही आणि आत यायलाही मागणार नाही, हे तिला माहीत होतं.
  विनीची आठवण होऊन तिला हसू आलं. त्या दोघी मिळून कुठेतरी जाणार होत्या आणि विनीचे कपडे बदलून व्हायचे होते. बेडरूममधे तिच्या समोरच विनीने फक्त चड्डी आणि ब्रा ठेवून बाकी सगळे कपडे काढले, आणि मग ज्योतीच्या तोंडाकडे बघून ती हसतच सुटली.
  " तुला एवढा धक्का बसला ? लग्न होऊन इतकी वर्ष झाली तरी तू इतकी लाजरी-बुजरी कशी गं ? "
  " लग्नाचा त्याच्याशी काय संबंध?".
 " तू अन् राम एकमेकांसमोर कपडे बदलत नाही ?"
 " नाही."
 " एकाच बेडरूममधे झोपता ना ? "
 "अर्थात."
 " मग करता तरी काय ? एकाचे कपडे बदलून होईपर्यंत दुसऱ्यानं बाहेर थांबायचं का ? "
 " आम्ही बाथरूममधे कपडे बदलतो."
 " माय गॉड. तू तर अगदीच पुराण्या जमान्यातली आहेस."

 ह्यानंतर बरेचदा तिच्या मनात यायचं की असं काही करून बघावं. रामच्या देखत कपडे बदलावे, किंवा तो अंघोळ करीत असताना त्याच्याबरोबर शावरखाली उभं रहावं. पण प्रश्न फक्त सवयीपेक्षा वेगळं करण्याचा, जास्त जवळीक साधण्याचा नव्हता. रामचं मत होतं की प्रत्येकाला आपला गाभा अतूट, अखंड ठेवण्यासाठी इतरांपासून एका ठराविक अंतरावर रहाण्याची गरज असते. त्याची अशी अनेक बाबतीत अगदी ठाम मतं होती, आणि तिची नव्हती. तेव्हा त्यांच्यातल्या नात्याचा पोत, त्याचं स्वरूप हे त्यानंच ठरवलं होतं आणि खरं म्हणजे त्या नात्याच्या चौकटीत ती आनंदात राहिली होती. पण त्याच वेळी ती जाणून होती की त्यात काही बदल करण्याची शक्यता नव्हती. सहज

साथ: ३