पान:साथ (Sath).pdf/77

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राखणं वगैरे काही जाणत नाहीत. इतके दिवस त्यांनी करार पाळला कारण ते त्यांच्या फायद्याचं होतं. आता करार मोडून जास्त फायदा होतोय म्हणून ते करार मोडतायत. तेव्हा थोडासा भाव वाढवून ते काही ऐकणार नाहीत. शिवाय थोडा जरी भाव वाढवला तरी आपली मार्जिन खूप कमी होते. मग आपल्याला परवडणं कठीण आहे."
 "पण बी हातचं जाऊ दिलं तर आतापर्यंत पिकावर केलेला खर्चसुद्धा भरून निघणार नाही."
 " बघतो ना कसा निघत नाही."
  "पण मी म्हणते झेड.पी.ला इतका भाव देणं कसं परवडतं?"
 " का नाही परवडणार ? समजा ह्या व्यवहारात तोटा झाला तरी तो काही झेड.पी. च्या अधिकाऱ्यांच्या खिशातनं येत नाही."
 काही दिवसांनी यशवंतरावांनी ज्योतीला भेटून सांगितलं की रामने जर कोर्टात खेचण्याची भाषा सोडून दिली तर पिकावर झालेला खर्च शेतकरी देतील असं ते बघतील. पहिल्यांदा राम ऐकून घ्यायला तयार नव्हता. तो म्हणाला जरी खटला जिंकण्याची शक्यता कमी असली तरी त्या लोकांना कोर्टात तारखेसाठी खेटे घालावे लागतील, खर्च करावा लागेल. तेवढंही काही कमी नाही. शेवटी कसंबसं ज्योतीनं त्याला पटवलं की त्यात त्याचा स्वत:चाही वेळ आणि पैसे खर्च होतील, तेव्हा समझोता करणं जास्त शहाणपणाचं. त्यानं ऐकल्यावर तिने सुटकेचा निःश्वास टाकला.
 ती म्हणाली, " बघ, खूप लोकांवर अवलंबून राहिलं म्हणजे हे असं होतं."
 "पण मग काय करायचं? जरी समजा आपण विकतो तेवढं सगळं बियाणं तयार करण्यासाठी लागेल तेवढी जमीन घेण्याइतके पैसे आपल्याकडे असते तरी सीलिंगमुळे आपण घेऊ शकणार नाही. तेव्हा आपल्याला इतरांच्या जमिनीवर बी करावंचलागणार."
 " आपण धंदा जरा आटोपशीर करू शकतो."
 "पण का? चांगला फायद्यात चाललाय. मागे पाऊल कशा-

साथ : ६९