पान:साथ (Sath).pdf/60

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बद्दल नसून त्या दिवसाला तोंड देण्याबद्दलही होती.
 तिनं खिडकीतनं बाहेर पाहिलं. जमीन रात्रीच्या पावसाने ओली होती, पण पश्चिमेकडचं आकाश नितळ निळसर राखी होतं आणि त्यात प्रकाशणाऱ्या पिवळ्याधमक चंद्राची किरणं अंगणातल्या ओल्या गुळगुळीत फरशीवर पडल्याने फरशी चकाकत होती.
 ती पुष्कळदा अशीच फटफटल्याबरोबर उठायची नि मळयात जायची. कुठेतरी पाणी चालू असायचं. ती थांबून थोडा वेळ भरणं बघायची. लहान मूल दुधाची बाटली रिती करताना पहाण्याचं जे समाधान असतं तेच तिला जमीन पाणी पिताना बघताना वाटे. मग ती दाऱ्यावरच्या गड्याशी चार शब्द बोलायची भेंडीची उगवण कशी झालीय, पुन्हा पाऊस कधी येणार, असलं काही तरी. बहुतेक रामचे वडील एव्हाना उठून बाहेर आलेले असत. ते राउंड घ्यायचे आणि ती त्यांच्याबरोबर फिरत आज काय कामं करायची ह्याबद्दल त्यांचा आराखडा ऐकायची. तिने प्रश्न विचारले तर ते मूर्ख आहेत असं किंचितही भासू न देता ते त्यांची उत्तरं देत. कामाचा दिवस सुरू व्हायच्या आत सकाळच्या शांत प्रहरी सासऱ्याबरोबर घालवलेला हा वेळ तिच्या फार आवडीचा होता.
 त्यांचं आणि रामचं नातं नेमकं काय होतं ह्याचा तिला कधी थांग लागला नाही. विशेष जवळचं नव्हतं, पण त्यात काही कटुता वगैरे तिला जाणवली नव्हती. ते कामापुरताच एकमेकांशी संबंध ठेवायचे आणि कामापुरतंच बोलायचे. त्याव्यतिरिक्त काही गप्पा मारलेल्या तिनं ऐकल्या नाहीत.
 आज तिला बागेत जायला वेळ नव्हता. लवकर तयारी व्हायला हवी होती. राम नेहमीसारखा अंथरुणात लोळत न पडता तिच्याआधीच उठला होता. आज त्याचा मोठा महत्त्वाचा दिवस होता. पुढे तो जे यशाचं शिखर गाठणार होता त्याची नांदी होती. सगळं नीट होईल ना, की कुठेतरी काही बिनसेल ह्याचा ताण गेले काही दिवस त्याच्या मनावर होता. पुढे पुढे असल्या

५२ : साथ