पान:साथ (Sath).pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समारंभाचं आयोजन करणं हा त्याच्या हातचा मळ झाला, पण हा त्याचा पहिलाच समारंभ होता. आणि तिला माहीत होतं की हया बाबतीत तिची कितीही नाखुषी असली तरी ती त्याच्या खांद्याला खांदा लावून प्रसंग साजरा करण्यासाठी पडेल ती मदत करणार होती.
 रामने बियाणावर प्रक्रिया करण्याच्या कारखान्याचा विषय प्रथम काढला तेव्हाच ती बिचकली होती. त्याच्याप्रमाणे तिलाही आपला धंदा वाढायला पाहिजे हे पटत होतं आणि त्याबरोबर येणारी आव्हानं ती हसत स्वीकारीत होती. पण ही एकदमच मोठी उडी होती. अर्थात त्यात धोकाही पत्करावा लागणार होता. डोक्यावर कर्जाचा बोजा पडणार होता.
 ती म्हणाली होती, " धंदा वाढलाय तेव्हा पाहिजे तितकं बियाणं हातानं प्रक्रिया करून तयार होणार नाही हे उघड आहे. पण यांत्रिकीकरण हळूहळू नाही का करता येणार? सगळी यंत्रं एकदम घेण्यापेक्षा एखादं एखादं घ्यावं असं मला तरी वाटतं."
 राम म्हणाला, "तसं केलं तर यांत्रिकीकरणाचा उद्देशच विफल होईल. आता असं बघ, समजा आपण फक्त बियाणं साफ करण्याचं यंत्र घेतलं, तर त्यातनं निघणारं बी औषध लावून पिशव्यांत भरण्यासाठी आपल्याला सैन्यच उभं करावं लागेल. म्हणजे लेबर अवाच्या सवा वाढणार. नाहीतर मग ते यंत्र पूर्ण क्षमतेपेक्षा फारच कमी वेळ चालवावं लागेल. म्हणजे ते परवडणार नाही कारण त्याची किंमत भरून निघणार नाही. शेवटी सगळं यांत्रिकीकरण एकदम करणंच सर्वात स्वस्त पडेल."
 " ते खरं. तरी पण एकदम इतकं थोरलं कुणाचं तरी कर्ज काढायचं म्हणजे माझी छातीच दडपते.”
  "कुणाचं तरी नाही, बँकेचं. बँकांचं कामच आहे ते. काही उपकार करीत नाहीत आपल्यावर. मग तू कॉमर्स कॉलेजात काय शिकलीस?"
 " ते पुस्तकातलं ज्ञान पुस्तकात ठीक आहे रे, पण खऱ्या आयुष्यात कितीतरी गोष्टी अपेक्षेविरुद्ध जाऊ शकतात. कदाचित

साथ: ५३