पान:साथ (Sath).pdf/45

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हल्ला करायचं त्यांना काही कारण नव्हतं. शी: !"
 जळवा काढून टाकल्यावर बराच वेळ तिच्या पायावरून रक्ताचे ओघळ वहात होते. हॉटेलातल्या सगळ्या लोकांनी 'ई', 'अगं बाई', 'माय गॉड' असे तऱ्हेतऱ्हेचे उद्गार काढून तिच्याभोवती गर्दी केली तेव्हा तिला आपण फारच शूर आहोत, असं वाटायला लागलं. पुन्हा कधी तिला इतक्या मोठ्या प्रमाणावर हया रक्तपिपासू जळवा दिसल्या नाहीत.
  नुसत्या जळवांबद्दलच्या विचारानेसुद्धा ती शहारली. तिनं पटकन इकडे तिकडे बघितलं आणि मग तिला स्वतःच्याच भेदरटपणाचं हसू आलं.
 तिच्या मनात आलं, माझी प्रत्येक आठवण रामशी निगडित आहे. जणू तो भेटण्यापूर्वीचं माझं आयुष्य अर्थहीन, वैराण होतं. त्या काळातल्या काही आठवणी कशा येत नाहीत मला ? याचा अर्थ असा धरायचा का की, त्याला जर मी हद्दपार केलं तर माझ्या आयुष्याचं वाळवंट होईल ? छे:, असं शक्यच नाही. तो माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी मी अर्थपूर्ण आयुष्य जगत होतेच आणि त्याला सोडल्यावर तसं जगता यायला हरकत नाही. त्यातली मेख अशी आहे की, एकदम सबंध भविष्यकाळाचा विचारच करायचा नाही. फक्त लहान लहान निर्णय घ्यायला सुरुवात करायची. उदाहरणार्थ, रामला सोडल्यावर मी कुठे राहणार आहे?
 पहिले थोडे दिवस तरी आईकडे राहण्याचा विचार मनात आल्या आल्याच तिनं बाद केला. हयाचं मुख्य कारण म्हणजे ती जे पाऊल टाकणार होती त्याबद्दल तिच्या आईची प्रतिक्रिया काय असणार याबद्दल ज्योतीची खात्री होती. आईच्या मनात रामबद्दल अढी असली तरी ज्योतीनं त्याला सोडण्याचा विचार करावा, हे तिला पटू शकलं नसतं. ती म्हणाली असती, " मला तुम्हा नव्या मुलींचं काही कळत नाही बाई. ज्या माणसाबरोबर इतकी वर्ष चांगला सुखानं संसार केला, त्याला काहीतरी क्षुल्लक कारण काढ्न सोडायचं? " सर्वसाधारणपणे लग्न हे पवित्र बंधन

साथ: ३९