पान:साथ (Sath).pdf/40

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ठरवल्यावर आणि मुली बघणं वगैरे प्रकार मुळीच आवडत नसल्यामुळे त्यानं विचार केला की, ज्योती काय वाईट आहे ? एखाद्या जास्त सुखवस्तू घरातल्या मुलीपेक्षा बरी कारण तिची कष्टाला तयारी आहे आणि तिनं जबाबदारी पेललेली आहे. श्रीमंताघरच्या लाडावलेल्या मुलीबरोबर संसार करणं कठीण. शेवटी कसंही पाहिलं तरी लग्न जुगारच आहे. तेव्हा ह्या मुलीबद्दल आपल्याला मनोमन जे वाटतंय त्याच्यावर विसंबून निर्णय घ्यायला काय हरकत आहे? आता तिला आपलं साम्राज्य दाखवताना त्याच्या मनात आलं, लग्न हे छान असतं. आत्तापर्यंत आपण किती एकटे होतो, आपल्याला साथी-सोबती नसल्यामुळे आपल्या आयुष्यात केवढी उणीव होती ते कळलंच नव्हतं त्याला. आपल्या शेजारून चाललेल्या ज्योतीला स्पर्श करावा, तिच्या नितळ त्वचेवरून हात फिरवून ती खरोखर तिथं आहे ह्याची खात्री करून घ्यावी, अशी त्याला तीव्र इच्छा झाली.
 तो म्हणाला, " इथे बसू या जरा. दमलीस का?"
 "थोडीशी.”
  विहिरीशेजारी आंब्याचं झाड होतं. त्याच्याखाली ती बसली. मिरचीच्या प्लॉटवर पाणी चाललं होतं. विजेच्या मोटरची गुणगुण ज्योतीच्या कानाला गोड वाटत होती. इथे किती शांत होतं आणि किती मोकळं. शहरात असं कधीच अनुभवायला मिळत नाही. थेट क्षितिजापर्यंत जाऊन भिडणारी हिरवीगार शेतं, तयार होत आलेला सोनेरी गहू, मधनं मधनं दिसणाऱ्या छोट्या छोट्या वस्त्या, झाडं सगळं ती अधाशीपणे डोळ्यांत साठवीत होती.
 " ही एवढीच जमीन. लहानसाच तुकडा आहे. कसं काय आवडलं सगळं तुला?"
 " ह्यात काही न आवडण्यासारखं आहे का?"
 " इतक्यात एवढी हुरळून जाऊ नको. इथे थोडे दिवस राहून बघ आधी."
  "आणखी एका वर्षानेसुद्धा मला आत्ता वाटतंय त्यापेक्षा काही

३४ : साथ