Jump to content

पान:साथ (Sath).pdf/39

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

लहानपणापासून जरी लग्न हा प्रत्येकीच्या आयुष्यातला अटळ टप्पा आहे असं ती धरून चालली होती, तरी आपलं स्वत:चं लग्न कदाचित होणार नाही हे तिला अनुभवानं पटलं होतं.
 ती अभ्यासात हुशार होती आणि निबंध-स्पर्धा, वक्तृत्वस्पर्धा ह्यांतही तिनं बरीच बक्षिसं मिळवली होती. तिचे सहाध्यायी तिच्याकडे यायचे ते नोट्स मागायला किंवा ते स्पर्धेत भाषण करणार असले तर त्यासाठी तिला मुद्दे विचारायला किंवा अशाच काही कारणासाठी. त्यांना तिच्याबद्दल काही वाटत असलंच तर त्यात लैंगिक आकर्षणाचा काही भाग नव्हता. विनाकारणच ओळख काढून बोलायला किंवा बरोबर मिरवायला त्यांना सुंदर आणि नखरेल मुली हव्या असायच्या. पहिल्यापहिल्याने तिला राग यायचा आणि पुन्हा येऊ दे तर खरं नोट्स मागायला, मी देणारच नाही, असं ती ठरवायची. पण मुळात ती सुस्वभावी होती. तेव्हा कुणाला पटकन नाही म्हणणं तिला जमायचं नाही. शिवाय असं केल तर आपल्या जवळपास कुणी फिरकायचं नाही हे कळण्याइतकं शहाणपण तिला होतं.
 बी. कॉम. च्या परीक्षेत तिला डिस्टिक्शन मिळालं आणि ती कॉलेजात पहिली आली. तिला बरीच बक्षिसं आणि शिष्यवृत्त्या मिळाल्या. त्यांच्या मदतीनं तिनं शिक्षण चालू ठेवायचं ठरवलं. आणि मग एकाएकी तिच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला. ते संपूर्णपणे गलितगात्र झाले. ती सर्वांत मोठी म्हणून कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर पडली. मग शिक्षणा-बिक्षणाचा विचार सोडून तिनं नोकरी धरली. आधीच फारसं शक्यतेच्या कोटीतलं नसलेलं लग्न आता आणखीच आवाक्याबाहेर गेलं. जेव्हा मग राम तिच्या आयुष्यात आला तेव्हा तिनं स्वत:ला एक सरळ व्यावहारिक प्रश्न विचारला. इतपत चांगलं स्थळ दुसरं कुठलं मिळणार आहे मला ? इथे हो म्हणण्यात काही धोका असला तर तो पत्करायला काय हरकत आहे ?
 राम वेगळ्या वाटेनं पण ह्याच ठिकाणी येऊन पोचला होता. त्याच्या मनात काही भुतं नव्हती. पण एकदा लग्न करायचं

[३]

साथ: ३३