पान:साथ (Sath).pdf/41

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वेगळं वाटणार नाही. माझी खात्री आहे. शेती करण्यात मजा असेल नाही?"
 "हं. सुरुवातीला थोडे दिवस वाटते मजा. मग सगळं तेच तेच वाटायला लागतं. लेबरवर देखरेख ठेवण्यापलीकडे फारसं काही करायचं नसतंच."
  पुढे पुढे तिला कळलं की, कामगारांना किंवा मजुरांना लेबर - तेसुद्धा नपुसकलिंगात - म्हणण्याचा शिरस्ताच आहे इथला. आज जास्तीचं लेबर बोलावलंय. लेबरचा पगार करायला जायचंय. जसं काही ती वेगवेगळी माणसं नसून काम करणाऱ्या शरीरांचा एक मोठा गठ्ठा असतो. तिला तसं म्हणायची कधी सवय झाली नाही.
  ती म्हणाली, " सगळं तेच तेच असलं तर मग देखरेखीची तरी काय गरज? त्यांना कामं माहीतच असतील."
 " देखरेखीशिवाय ते करतात त्याच्या निम्म्यानेसुद्धा काम करणार नाहीत.
 " सगळेच काय चुकार असतात?"
 " असतात. थोडाफार चुकारपणा निकृष्ट अन्न, अशक्तपणा ह्यामुळे असेल. पण ह्यातले काहीजण तरी कंत्राटावर दिलं तर दुप्पट काम करू शकतात."

 " कंत्राटावर काम करून ते जास्त पैसे मिळवतात का ?"
 "जे चांगले कामगार असतात ते खूपच जास्त मिळवू शकतात. पण जे मुळातच सुस्त असतात ते रोजच्या हजेरीएवढे तीन रुपयेसुद्धा मिळवू शकत नाहीत आणि बाबा मला त्यांना कामावरून कमी करू देत नाहीत, कारण ते आमच्याकडे पुष्कळ वर्ष आहेत. मी काही बाबांशी वाद घालीत बसत नाही. शेतीचं सगळं ते त्यांच्या पद्धतीनं बघतात. मी त्यात लक्ष घालत नाही. बियाणाचा धंदा आता मी जवळजवळ संपूर्णपणे बघतो. खरं म्हणजे मला शेतीपेक्षा त्याचीच जास्त आवड आहे. नवीन जाती, हायब्रिड, ह्यांच्यामुळे ह्या धंद्याला फार चांगले दिवस येणार आहेत. फक्त एकच आहे. हा धंदा काय किंवा कुठलाही धंदा, मोठ्या प्रमाणावर करायचा म्हणजे आम्ही आतापर्यंत केला तसा काही नीट

साथ : ३५