" तुला बायको म्हणून चांगली साथ देईल. कर्तबगार, जबाबदारी पेलायला समर्थ वाटली. उगीच शोभेची बाहुली नाहीये."
" म्हणजे कुरूप आहे असं सरळच म्हणा की." तो हसला आणि वडील काही बोलायच्या आतच म्हणाला, "तुमचं बरोबर आहे, बाबा. साड्या न दागिने ह्याच्यापलीकडे विचार न करणाऱ्या रिकाम्या डोक्याच्या नि सुंदर तोंडाच्या बायकोला घेऊन मी काय करू ?"
पण हे बोलून दाखवलंन तरी प्रथम जेव्हा त्याने काळयासावळया, जरा जाडीकडेच झुकणाऱ्या बांध्याच्या, दहाजणीतसुद्धा उठून न दिसेल अशा ज्योतीला पाहिलं तेव्हा चुटपुटतच त्याने प्रत्येक पुरुषाच्या स्वप्नातली गोरी, सुंदर, शेलाटी मुलगी आपल्या मनातून काढून टाकली.
ह्या पहिल्या भेटीत त्याने ज्योतीशी एकटीशीच बोलण्याची इच्छा व्यक्त केली. ज्योतीच्या आईला ही कल्पना जरा चमत्कारिक वाटली, पण शेवटी त्यांना दोघांना त्यांच्या दोन खोल्यांच्या ब्लॉकच्या बाहेरच्या खोलीत बसून बोलायला तिनं परवानगी दिली. मधलं दार लावलेलं होतं आणि रामची खात्री होती की, सगळ्यांचे कान त्या दाराला लागलेले असणार पण त्याला त्याची हरकत नव्हती. त्याला फक्त त्याच्या समोर ज्योतीशिवाय दुसरं कुणी नको होतं. त्याला आपल्याशी एकटीशीच काय आणि कशासाठी बोलायचंय, ह्याची काहीच कल्पना नसल्यामुळे ती जराशी बावरली होती.
तो म्हणाला, " तू माझ्या वडिलांना भेटली होतीस का?"
"हो."
"आम्ही कुठे राहतो, ते कसलं ठिकाण आहे, तू माझ्याशी लग्न केलंस तर तुझं आयुष्य कशा तऱ्हेचं असेल ह्या सगळ्याची कल्पना त्यांनी तुला दिली का ?"
"हो."
" तिथे येऊन रहायला तुझी खरंच हरकत नाहीये का?" तिनं मान हलवली.
पान:साथ (Sath).pdf/36
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३०: साथ