पान:साथ (Sath).pdf/33

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मदत लागली तर बिनदिक्कत मागता येते."
 " तुम्हाला मदतीची गरज होती तेव्हा आला होता का एकतरी हरीचा लाल मदत करायला? त्यांच्यापैकी कुणी तुम्हाला घरात घेतलं ? तुमचं घर वाचवलं? तुमची पिकं उद्ध्वस्त करणाऱ्यांना थांबवलं? त्यांच्याशी शेजारधर्म पाळून काय फायदा झाला तुमचा ?"
 " अशावेळी त्यांनी मला मदत केली असती तर त्यांच्याच जिवावर बेतलं असतं. त्यांच्या घराची राखरांगोळी झाली असती. असं माहीत असताना तू तरी मदत केली असतीस कुणाला?"
 " अर्थात."
 श्रीपादराव नुसतेच हसले. खरं म्हणजे राम शेजाऱ्यांशी फटकून वागत असला तरी बेमुर्वतपणे वागत नसे. इकडे-तिकडे कुणी भेटला तर त्याच्याशी हवा-पाणी-पीक हयाबद्दल गप्पा मारायचा. कुणी मागितली तर बैलजोडी द्यायचा, मळणीयंत्र द्यायचा. त्यांना बी-बियाणं विकायचा. एक मात्र होतं. तो त्यांच्याकडून कधी काही मागायचा नाही. ते जाणून होते की, शेजाऱ्यांचं नातं हे देवघेवीचं नातं असतं, आणि जो तुमच्याकडून कधी काही मागत नाही तो स्वतःला तुमच्यापेक्षा श्रेष्ठ समजतो. शेजाऱ्यांशी मैत्री ठेवण्याने आपण बिनधोक राहतो, यावर रामचा विश्वास नव्हता. संरक्षणासाठी त्यानं दोन अल्सेशियन कुत्री आणि एक दुनळी बंदूक ठेवली होती.
 "बंदुकीनं सगळ्याचं उत्तर देता येत नाही," त्याच्या वडिलांनी सांगितलं. " किती माणसं मारू शकशील तू ? शेवटी ते तुझ्यावर मात करतीलच."
  " हरकत नाही. कधीतरी एक दिवस मरायचंच आहे. पण मी लढत मरेन. पळून जाणार नाही."
 वडील सुस्कारा सोडून म्हणाले, " ती वेळ कधी येऊ नये एवढंच माझं देवाजवळ मागणं आहे."
 रामने लग्न हया गोष्टीचा स्वतःच्या संदर्भात कधी विचार केला नव्हता. त्याच्या वडिलांनी आणि आत्याने लग्नाचा प्रस्ताव

साथ: २७