पान:साथ (Sath).pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काही थोड्या किमती वस्तू एवढंच वाचवता येईल हे कळण्याइतके ते सूज्ञ होते. तेव्हा त्यांनी आपली बायको, मुलं, म्हातारी आई हयांच्याबरोबर थोडे कपडे आणि चार सोन्याचे दागिने होते ते, एवढयानिशी पळ काढला. बैलगाडीनं रातोरात प्रवास करून ते त्यांच्या एका मित्राच्या वस्तीवर पोचले. मित्र त्या काळात सुरक्षित असणाऱ्या जातीचा होता, पण तो आपल्याला आसरा देईल, अशी श्रीपादरावांची खात्री होती. रात्री चोरासारखा त्यांनी त्याच्या घरात प्रवेश केला आणि कोठारात लपून राहिले. एक आठवडाभर दिवसा लपून राहयचं आणि फक्त रात्री बाहेर पडायचं. दिवसभर कोठाराला बाहेरून कुलूप घातलेलं असायचं. मुलांना आवाज न करण्याबद्दल सक्त ताकीद होती. धाकटया बाळाने रडू नये म्हणून त्याला अफूची गोळी द्यायची. वातावरण पुरेसं निवळल्यावर ते गावी परतले ते घरादाराची राखरांगोळी पहायला. वस्तीवर मागे राहिलेले गडी होते त्यांच्या मदतीने श्रीपादरावांनी राखेतून सगळं पुन्हा उभं केलं. कुणी म्हणत त्या गड्यांनी जाळपोळीत भाग घेतला होता. श्रीपादरावांनी कशाची चौकशी केली नाही की कुणाला जाब विचारला नाही. देवाची मर्जी म्हणून जे झालं होतं ते त्यांनी सोसलं. हा देव आपल्यावर खार खाऊन का आहे, असा विचार त्यांनी केला नाही. त्यांचं जीवन हळूहळू पूर्वस्थितीला आलं. आपण इथे राहतो तर आपल्याला वाचवायला ज्यांनी हात उचलला नसता अशी खात्री होती, त्या शेजाऱ्यांशी ते नेहमीसारखे मित्रत्वानेसुद्धा वागायला लागले. राम सगळया भावंडांत थोरला आणि जे काय घडलं ते थोडंफार कळण्याइतका मोठा. त्यानं झाल्या गोष्टीबद्दल द्वेषाची भावना जन्मभर मनात वागवली. तो आसपासच्या शेतकऱ्यांशी फटकून वागला की श्रीपादराव त्याला म्हणत, "असं करू नये, राम. शेजारधर्म म्हणून असतो. त्यांच्याशी मैत्रीच केली पाहिजे असं नाही म्हणत मी. पण गोडीनं वागावं. त्यांना काही कामासाठी बैलजोडी लागली, एखादं अवजार लागलं, तर द्यावं. त्यांच्याकडे लग्न असलं तर आहेर घेऊन जावं. मग एखाद्या वेळी आपल्याला

२६ : साथ