प्रथम त्याच्यापुढे मांडला तेव्हा त्याला नवल वाटलं. त्यानं बराच काळ विचार केला. त्यानं अगदी जवळून पाहिलेलं असं एकच जोडपं होतं, ते म्हणजे त्याचे आईबाप. त्यांच्या नात्यात असं काही त्याला आढळलं नव्हतं, की त्यामुळे त्याला स्वतःला लग्न करण्याची तीव्र इच्छा व्हावी. तसं ते दोघं भांडत-तंडत असत असं नाही, पण त्यांचा एकमेकांशी फारसा संबंधच नाही असं रामला वाटायचं. ते शेती नि बियाणाचा धंदा बघायचे. ती घर, मुलं नि दूधदुभत्याचं बघायची. एकत्र आली की त्यांचं संभाषण ह्या सगळ्या दिनक्रमाभोवतीच फिरायचं. त्यांचा एकमेकांवर फार जीव असल्याचा पुरावा रामला कधी मिळाला नव्हता. ती मेली तेव्हा त्यांनी अश्रू ढाळले होते पण त्याच्यामागे प्रचंड दुःखाचे कढ नव्हते. ती मेल्यानंतर थोड्याच दिवसांत त्यांनी आपल्या विधवा बहिणीला घरी आणलं, आणि मग त्यांचं घर पूर्ववत चालू झालं. लग्न म्हणजे हे एवढंच असलं तर लग्न करण्यात काय हशील आहे, असा रामला प्रश्न पडला.
तो म्हणाला, "मला इतक्यात लग्न करायचं नाही."
वडील म्हणाले, "फार दिवस थांबलास तर मनासारखी बायको मिळणं जड जाईल."
"नाही मिळाली तर नाही करणार लग्न." " आत्ता असं म्हणायला सोपं आहे, पण दहा वर्षांनी मलाच नावं ठेवशील तुझं लग्न जमवलं नाही म्हणून."
" नावं ठेवलीच तर ती तुम्हाला ठेवणार नाही. मग झालं ?"
" पण लग्नाविरुद्ध काय आहे तुझं?" त्याच्या आत्यानं विचारलं.
तिला लग्नाच्या बाजूने काय आहे तुझं म्हणून विचारायचं त्याच्या जिभेवर होतं, पण तो बोलला नाही. तिचा नवरा 'दिवसा खोकला न रात्री हिवज्वर' असल्यातला होता. शिवाय खत्रुडही होता. तिला मागे काही न ठेवता तो मरून गेल्यावर सासूसासऱ्यांकडे बिनपगाराची मोलकरीण म्हणून राबायचं अन् वर पुन्हा तिला न् तिच्या कारटयांना पोसणं किती महागात पडतं हे
पान:साथ (Sath).pdf/34
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
२८ : साथ