पान:साथ (Sath).pdf/31

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 " तसे कुणी नाहीयेत मित्र मला. निदान इथे येऊन राहिलेले आवडतील असे तर नाहीतच."
 " कॉलेजात इतक्या वर्षांत कुणी मित्र नाहीत झाले तुझे?"
 " माझी कुणाशीच तितकी जवळीक झाली नाही. मी त्यांच्यापेक्षा वेगळा होतो, खेडवळ होतो. मला नेहमी वाटायचं, माझ्यापाठीमागे ते माझी टर उडवतायत म्हणून."
 लोकांनी कुचेष्टा करण्याची, अपमान करण्याची रामला सगळ्यात जास्त भीती वाटायची. म्हणूनच आपल्या शहरी मित्रांचं बारकाईनं निरीक्षण करून त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करताकरताच तो त्यांच्यापासून चार हात दूर रहात असे. आपलं बाहयस्वरूप त्यांच्यापासून वेगळं ओळखू येणार नाही आणि आपण त्यांच्यात सर्वस्वी सामावून जाऊ शकू, अशी खात्री झाली तोपर्यंत त्यांच्यातला एक होण्याची त्याची इच्छा मावळली होती. आता त्याला त्यांच्याबद्दल तुच्छता वाटायला लागली होती. परीक्षेतल्या मार्कात ते त्याच्यापेक्षा वरचढ असतील, पण शेतीतलं प्रत्यक्ष ज्ञान आणि अनुभव त्याच्या गाठीशी जास्त होते. त्याच्याबरोबरीचे बहुतेक विद्यार्थी शेतकी खात्यातल्या नोकरीवर डोळा ठेवून शेतकी कॉलेजात शिकत होते. रामची धारणा होती की कारकुनी वृत्तीच्या माणसाला हे ध्येय ठीक असलं तरी महत्त्वाकांक्षा आणि नवनिर्मितीची क्षमता असलेल्याच्या दृष्टीने ते क्षुद्रच.
 तो कायम घरी आला तोवर त्याला कळलं होतं की, आपल्याला माणसांची गरज नाही. निदान माणसांशी फारशी जवळीक असण्याची गरज नाही. हे त्याच्या दृष्टीने सोयीचं होतं, कारण तो जिथे रहात होता तिथे बरोबरीची वाटावीत अशा लोकांशी संबंध यायची फारशी शक्यता नव्हती. आधी शिरगाव हे खेडेवजाच गाव. त्यातून त्यांची वस्ती गावाबाहेर दोन-तीन मैल होती. खरं म्हणजे हे अंतर काही फार नव्हतं, पण तरी महात्मा गांधींच्या खुनानंतरच्या सूडाग्नीत हिंसक जमावाचं लक्ष्य बनण्याइतपत त्यांची वस्ती एकाकी होती. श्रीपादरावांना हा उद्रेक आपल्यापर्यंत पोचणार हयाची कल्पना आली. या परिस्थितीत आपले जीव आणि

साथ: २५