पान:साथ (Sath).pdf/30

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खऱ्या परिस्थितीचं वर्णन होतं असं ज्योतीला लवकरच कळून चुकलं होतं. याचं कारण म्हणजे त्यांच्या चिमुकल्या कुटुंबाचा तो कर्ता होता. त्यांच्या घरात रामचे वडील, त्यांची बायको वारल्यानंतर त्यांनी घरातलं करायला आणून ठेवलेली त्यांची विधवा बहीण आणि तिचा मतिमंद मुलगा एवढी माणसं होती. रामचे वडील म्हातारे होते, आणि फारसं बोलत नसत. पण प्रकृतीनं खुटखुटीत आणि स्वतंत्र वृत्तीचे होते. अधिकार गाजवणारे नसले तरी दुबळेही नव्हते. त्यांच्या तरुणपणी ते त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून वावरले असले पाहिजेत आणि बाकीच्यांनी, रामनेदेखील त्यांचा अधिकार मान्य केला असला पाहिजे. त्यांनी आता कर्तेपण आपण होऊन रामवर कसं सोपवलं हयाचं ज्योतीला आश्चर्य वाटलं. पण मग जसजशी रामची पुरी ओळख होत गेली तसं तिला कळून चुकलं, की त्यांच्या स्थानांची अदलाबदल रामनंच घडवून आणली असली पाहिजे कारण कोणत्याही समूहातलं दुय्यम स्थान स्वीकारण्याचा त्याचा स्वभाव नव्हता. खरं म्हणजे कुटुंबाचा एक घटक म्हणून तो जगतच नव्हता. तो त्याच्या मार्गाने जायचा, त्याचे स्वतःचे निर्णय घ्यायचा आणि त्यांच्याबद्दल कुणाचाही सल्ला विचारायची त्याला गरज वाटत नसे. ज्योतीला पहिल्यापासून त्याच्यातल्या ज्या आत्मविश्वासाचं आणि करारी स्वभावाचं आकर्षण वाटलं त्याच्या मुळाशी हीच परिस्थिती होती. राम माणसांच्या गर्दीमध्ये एकटाच असे. त्याला जशी कुणाचा सल्ला घ्यायची जरूर वाटत नसे, तशी त्याच्या कुटुंबियांशी गप्पा मारण्याची, आज काय काय झालं त्याचा ऊहापोह करण्याचीही वाटत नसे. त्याच्या एकाकी आयुष्यात फक्त ज्योतीलाच प्रवेश होता, आणि त्यानं आपल्याला हा फार मोठा सन्मान बहाल केलाय असं तिला वाटायचं.
 तिनं एकदा त्याला विचारलं, " तुला कोणी मित्र नाहीत का?"
 "इथं ?"
 " इथं नसतील; पण पुण्यात तरी? कॉलेजातले मित्र वगैर कुणी इथे येत नाहीत का?"

२४ : साथ