पान:साथ (Sath).pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ह्याचाच आविष्कार किंवा बरेच दिवसांच्या संबंधापोटी येणारं कुतूहल असेल. ती इथे एकटी येण्याची ही पहिलीच वेळ होती, तेव्हा त्यांना सगळ्यांना ह्यात काहीतरी वेगळं, विचित्र आहे असं वाटणं साहजिक होतं. पण तिला मात्र त्या सगळ्यांच्या बोलण्यात पैशाची मुक्त पखरण करणाऱ्या धनवानाला जी आदब दाखवतात त्याचा वास आला.
 राम तिथं राहून जाताना दर वेळी सढळ हातानं बक्षिशी वाटायचा. मॅनेजरलासुद्धा तो बक्षिसादाखल अधनंमधनं एक व्हिस्कीची बाटली आणायचा. आठवडाभर राहून दोनेकशे रुपयांची बक्षिशी दिली म्हणजे ज्योतीला धक्काच बसायचा. राम म्हणायचा की, होटेलमध्ये ज्यांच्यावर आपलं स्वास्थ्य-समाधान अवलंबून असतं त्यांनाच नेहमी सगळ्यात कमी पैसे मिळतात. शिवाय बक्षीस दिलं की ते लोक आपली जास्त चांगली देखभाल करतात. हे मात्र खरं असल्याचा ज्योतीला पुरावा मिळाला होता. अगदी गर्दीच्या सीझनमधेसुद्धा आधी राखून न ठेवता त्यांना खोली मिळत असे, आणि होटेल संपूर्ण भरलेलं असताना आणि सगळ्यांच्या हाकेला ओ द्यायला रुमबॉईजना वेळ पुरा पडत नसतानाही रामने घंटा वाजवल्याबरोबर कुणीतरी हजर होत असे. ती सगळी राम पेरीत असलेल्या पैशाची किमया होती. पण जे हक्कानं मिळालं पाहिजे ते विकत घेण्याचा प्रकार ज्योतीला मंजूर नव्हता. आपण काहीतरी चोरटा व्यवहार करीत असल्यासारखं वाटायचं. आणि त्या पैशासाठी हांजी हांजी करणाऱ्या होटेलातील नोकरांचा तिला तिटकारा यायचा. एकटी असताना आपण एवढ्या मोठ्या टिप्स देणे शक्य नाही, हे ती जाणून होती. आणि खरं म्हणजे हया क्षुद्र कारणासाठीच ब्ल्यू व्हॅली होटेलला परत जायचं तिनं टाळलं होतं.
 ती खोलीत जाऊन कपडे बदलून पलंगावर पडली, पण तिला झोप येईना. तिचा आधीचा मूड विरून गेला होता. नाही म्हटलं तरी रामच्या फोनने तिला विचलित केलं होतं. तिच्या मनात चंचूप्रवेश करून त्याने आता तिच्या विचारांचा ताबा घेतला होता.

साथ: १९