पान:साथ (Sath).pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रकाशात बाग हे नाव धारण करणारी दोनचार जातीच्या फूलझाडांची खिचडी दिसत होती. त्याच्यापलिकडे अंधार होता, पण त्याही पलिकडे गावातले दिवे, माणसांचे आवाज, गाड्यांचे दिवे दिसत होते. ब्लू व्हॅली होटेल सोळशी खोऱ्याच्या काठावर होते आणि त्याच्या व्हरांड्यातून ते खोरं, त्यातली झाडी, धबधबे आणि लांबवर खाली नदीची धांदोटी दिसायची. प्रथम जेव्हा तिनं ब्लू व्हॅली हे नाव ऐकलं तेव्हा तिला वाटलं होतं की, हे आपलं काहीतरी नाविन्याच्या सोसाने ओढूनताणून दिलेलं नाव आहे. पण मग तिनं पाहिलं की विशिष्ट प्रकाशात, दिवसाच्या विशिष्ट वेळेला सोळशीचं खोरं खरोखरीच निळं दिसतं. ब्लू व्हॅली होटेल बाजारापासून आणि सगळ्या मुख्य रस्त्यांपासून पुरेसं दूर होतं त्यामुळे रात्री त्याच्या व्हरांड्यात बसून फक्त रातकिड्यांची किरकिर ऐकू यायची. आणि कधीकधी दारू पिऊन सैल सुटलेल्या पाहुण्यांचा गोंधळ, ज्योतीच्या मनात आलं. पण बहुतेकदा ते होटेल खूपच शांत असायचं, विशेषत: आपल्याला सुदैवाने स्वतंत्र ब्लॉक मिळाला तर.
 तेव्हा हे सगळं सोडून तिनं गुलमोहोर होटेलमध्ये राहणं पसंत करावं ह्याचं रामला आश्चर्य वाटणं साहजिक होतं. खरं म्हणजे तिनं मुद्दामहून हेच होटेल काही निवडलं नव्हतं. ब्लू व्हॅली सोडायचं ठरल्यावर हे पहिलंच तिला सापडलं की जिथे एक सिंगल रूम मोकळी मिळाली. तिनं लगेच ऑफिसात जाऊन रजिस्टरमध्ये नाव लिहिलं आणि तिथल्या रूम-बॉयला चिट्ठी देऊन ब्लू व्हॅलीतनं तिचं सामान आणायला पिटाळलं. हा जरासा बालिशपणाच झाला, पण ब्लू व्हॅलीमधे परत जाऊन तिथल्या लोकांना तोंड द्यायचं तिला एकदम संकट वाटायला लागलं. ती तिथे पोचल्यापासून चौकीदार, रूम बॉय, तिला जेवण वाढणारा वेटर, नेहमीप्रमाणे तिला गुलाबाचं फूल देणारा माळी, अगदी मॅनेजरसुद्धा, प्रत्येकानं तिला अगदी तेच तेच प्रश्न विचारले. 'बाई, ह्यावेळी एकटयाच ? साहेब नाही आले ? मागून येणारेत का ?' कदाचित हा नुसताच शिष्टाचार असेल. 'नमस्कार, कसं काय

१८: साथ