पान:साथ (Sath).pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आयुष्यातला एक फार मोठा निर्णय आपण घेतो आहोत, याची तिला पुन्हा एकदा जाणीव झाली. हा निर्णय तिला ज्या दिशेने नेणार होता तिथून परत फिरण्याची शक्यता नव्हती. आणि इतकं असूनही आपण असं का करतो आहोत, याचं नेमकं उत्तर आपल्याला देता येईल, असं तिला वाटत नव्हतं. निदान मी अमुक एक-दोन-तीन हया कारणांसाठी तुझ्याबरोबर राहू शकत नाही, असं रामला पटेलशा तऱ्हेने रीतसर विवरण तिला करता येत नव्हतं.
 तिला वाटलं, वर्तमानपत्रांतून मानसशास्त्रीय लेख लिहिणाऱ्यांचं कदाचित बरोबर असेल. कुठल्याही दोन माणसांना वीस वर्षांपेक्षा जास्त काळ गोडीगुलाबीने एकत्र रहाणं शक्य नसतं असं तिनं कुठेतरी वाचलं होतं; पण तिला यापेक्षा जास्त वर्ष एकत्र राहिलेली थोडीथोडकी नाही, पुष्कळ जोडपी माहीत होती. त्यातल्या काहींचे एकमेकांशी मूलभूत मतभेद असूनसुद्धा.
 तिनं पुन्हा दिवा लावला आणि वाचण्याचा प्रयत्न केला. पण पुस्तकात तिचं मनच लागेना, ते विचारात भरकटत जायचं आणि कुठूनही सुरुवात झाली तरी शेवटी अटळपणे रामच्या आणि तिच्यापाशी येऊन थांबायचं.
 त्यांच्या एकत्र आयुष्याची सुरुवात महाबळेश्वरातच झाली होती. ती महाबळेश्वर पहिल्यांदाच पहात होती आणि रुक्ष, कंटाळवाण्या आयुष्यातून सुटका करून आपल्याला कुणीतरी स्वर्गात आणून टाकलंय असं तिला वाटत होतं. राम तिचा वाटाड्या होता आणि जणू तिच्या खास खुशीसाठी आपणच द्या वृक्षवेली, ही दऱ्याखोरी, धबधबे, ताजी थंड हवा सगळं निर्माण केलंय अशा थाटात तो तिला सगळं दाखवीत होता. बाजारातनं हिंडताना तिच्यासाठी कुठे चिटुकला बोटाएवढा चपलांचा जोड, कुठे कानात घालायचे लाल खडे, कुठे कोरलेले शिंग अशा शक्य तितक्या निरुपयोगी वस्तू विकत घेत होता. तिला तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ खाऊ घालत होता. ती जरा जरी दमल्यासारखी दिसली तरी ताबडतोब तिला बसून विश्रांती घ्यायला लावीत होता.

२०: साथ