पान:साथ (Sath).pdf/179

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पिशव्यांत दुसरंच बी भरून विकलंय कुणीतरी."
  " ते कसं शक्य आहे. "
 तो दारू ठेवलेल्या कपाटाशी गेला आणि त्याने एका ग्लासात व्हिस्की ओतून थर्मासमधून बर्फाचे खडे काढून त्यात टाकले.
 " ड्रिंक घेणार ?"
  " नको."
 तो आपलं ड्रिंक घेऊन तिच्यासमोर येऊन बसला.
 " आधी मला वाटलं, कुणीतरी आपल्यासारख्या पिशव्या छापून घेतल्यात. पण ते तितकं सोपं नाही. तेच मटीरियल घेऊन पिशव्या शिवता येतील, पण अगदी तसलाच ब्लॉक करवून घेणं कठीण आहे. अर्थात कापड, दोरा हयाचे सप्लायर्स, ब्लॉकमेकर, पिशव्यांची शिलाई करणारे, सगळयांकडे चौकशी सुरू केलीच आहे. पण कुणीतरी इतके कष्ट घेऊन अगदी हुबेहुब आपल्यासारख्या पिशव्या बनवल्या असल्याची शक्यता जरा कमीच आहे. कुणीतरी आतल्या माणसाने बोगस बी विकणाऱ्यांना आपल्या पिशव्या विकल्या असल्या पाहिजेत. प्रत्येक लॉटमधून थोड्या थोडया चोरून ठेवल्या असणं शक्य आहे."
 " पण मग स्टोअरकीपरला ते कळायला पाहिजे."
 " अर्थात. जरी समजा प्रत्येक लॉटमधल्या काही पिशव्या बाद कराव्या लागल्या तरी ते त्याच्या परवानगीशिवाय होऊ शकत नाही. तेव्हा प्रत्येक लॉटमधे थोड्या पिशव्या कमी आल्या आणि त्याने त्याबद्दल काही नोंद केली नाही तर त्याचा अर्थ त्याला तोंड बंद ठेवण्यासाठी कुणीतरी लाच चारली असली पाहिजे, नाहीतर तोच हे करतोय. काहीही असलं तरी त्याच्या संगनमताशिवाय असं काही होणार नाही."
 " मग तू काय करणारेस आता?"
 " मी कोरेला सप्लायर्सकडे पाठवलंय, जास्त मटीरियल त्यांनी दिलेलं आहे का ते पहायला. मग शिवून आलेल्या पिशव्या, भरलेल्या पिशव्या, विक्री झालेल्या आणि गोडाउनमधे शिल्लक असलेल्या अशी सगळी आकडेवारी काढतोय. सगळी माहिती

१७२: साथ