पान:साथ (Sath).pdf/180

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

माझ्या हातात आली की स्टोअरकीपरच्या गळ्याभोवती फास आवळलाच म्हणून समज. मग तो इतर कोणकोण त्यात गुंतलंय त्यांची नावं देईल. आणि मी नुसतं सगळ्यांना हाकलून देणार नाही, त्यांच्यावर फौजदारी करणार आहे. चांगला धडा शिकवणार आहे त्यांना."
 " कंपनीविरुद्ध कोणीतरी केस केलीय ना? त्याचं काय?"
 " त्यात काही अर्थ नाही. त्या पिशव्यांच्या टॅग्जचे नंबर आपले नाहीत हे आपण सहज सिद्ध करू शकू." तो हसला. " शेवटी त्यांची अक्कल कमी पडली."
 तिच्या मनात आलं, म्हणजे हे काही खरंखुरं संकट नाही. त्यासाठी मी मुद्दाम इथे राहायची गरज नाही.
 ती म्हणाली, " ज्यांना तुम्ही चांगली वागणूक दिली, ज्यांच्यावर विश्वासाने जबाबदारी सोपवली, त्यांनी विश्वासघात करावा हे किती वाईट."
 " माणसं अशीच असतात. ज्यो. निष्ठा, प्रामाणिकपणा हे शब्द जुनेपुराणे झाले आता. शक्य आहे तेवढं आपल्या घशात घालायचं ही आजची संस्कृती आहे. पण आपल्या लोकांचा एक हिशेब चुकला. त्यांना काय वाटलं मी गप्प बसून ऐकून घेईन म्हणून ? माझ्या पाठीत खंजीर खुपसून ते सहीसलामत सुटतील म्हणून?"
 राम नेहमी बोलायचा तसंच बोलत होता. तरीपण त्यात ज्योतीला काहीतरी वेगळं वाटलं. सत्ता हातात असलेल्या माणसाच्या बोलण्यातल्या कणखरपणाऐवजी आरडाओरडा करून धमक्या देणाऱ्याच्या बोलण्यातला पोकळपणा त्यात जाणवत होता. अर्थात रामच्या हातात सत्ता होती आणि तो म्हणाला तसं करून दाखवणं त्याला सहज शक्य होतं. तरीही तिला हा सूक्ष्म फरक जाणवला. आणि हा फरक काही चारदोन दिवसांत पडला नव्हता. तो बरेच दिवस पडत गेला असला पाहिजे. पण ती सदैव त्याच्याजवळच रहात असल्यामुळे तिला तो आतापर्यंत जाणवला नव्हता.
 तिनं त्याच्याकडे अगदी अलिप्त नजरेनं पाहिलं. ज्याचा माझ्या

साथ: १७३