पान:साथ (Sath).pdf/178

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टलिफोन ऑपरेटर काही ड्यूटीवर नसणार, तेव्हा बाहेरची लाइन सरळ ऑफिसला जोडलेली असेल अशी आशा करीत तिनं नंबर फिरवला.
 फोन तीनदा वाजला, मग राम म्हणाला, "हॅलो."
 " राम.”
 " ज्यो, कुठेयस तू ?"
 " घरी."
 " मी आत्ताच्या आत्ता निघतोय. दहा मिनिटांत घरी पोचेन. कुठे जाऊ नकोस. तिथेच थांब. आलोच मी."
 त्याचा आवाज, तोही आनंदाने ओतप्रोत भरलेला, ऐकून तिच्या हृदयात धडधड व्हायला लागली. भूतकाळात जाणं किती सोपं होईल ! पण त्यात काही अर्थ नव्हता. कारण तसं करून पुन्हा ती होती तिथपर्यंत येऊन ठेपली असती. आणि मग मिनिटांमागून मिनिटं चालली तशी त्याच्याशी होणाऱ्या भेटीची तिला धास्ती वाटायला लागली. परत येणं ही खरंतर चूकच झाली. तिला जे सांगायचं होतं ते ती कसं सांगणार होती? कुठल्या शब्दांत ? आणि त्याच्याशी वागणार कसं होती ? त्रयस्थासारखं ? की खेळीमेळीनं, पण ठामपणे? आणि मग काय ? जेवण करून " येते मी" असं सांगून जायचं? की रात्र इथेच काढायची? कुठे ? त्याच्या शेजारी?
 राम आत आला तो अगदी सहजपणे म्हणावं तसं "हॅलो, ज्यो" म्हणत. त्याचा फोनवरचा उसळता उत्साह मावळला होता.
 " कसा आहेस?"
 " मी ठीक आहे. आणि तू?"
  तिला एकदम हसू फुटलं. " हा कसला वेड्यासारखा औपचारिकपणा?" तो अवघडल्यासारखं वागल्यामुळे तिला त्याच्याशी जेवढी जवळीक वाटली तेवढी त्यानं तिला आवेगाने मिठीत घेतली असती तर वाटली नसती.
 ती म्हणाली, " हा खराब बियाणाचा काय प्रकार आहे ?"
 " ओ: ! काही नाही. ते आपलं बी नाहीच आहे मुळी. आपल्या

साथ : १७१