पान:साथ (Sath).pdf/177

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दुखावलाय हे कबूल करताना तिला स्वत:चं हसू येत होतं.
 पार्वती काहीतरी बाजार करून परत आली. तिचे डोळे चमकले. " बाई, तुम्ही आलात !"
 बरेच दिवस आपण कुठे गेलो होतो ह्याचा तिला प्रश्न पडला असेल का असं ज्योतीच्या मनात आलं. तिनं रामला विचारलं असेल का? रामनं तिला काय सांगितलं असेल?
 " कशी आहेस, पार्वती ? सगळं ठीक आहे ना?"
 " सगळं ठीक आहे. बाई, मला माझ्या नणंदेच्या घरी जायचंय. तिच्या मुलीचा साखरपुडा आहे आज. ते आधीच गेलेत साहेब म्हणाले होते जेवण करून ठेव नि तू जा."
 " मग जा ना तू. स्वैपाक करून ठेवायची गरज नाही. मी करीन."
 साहेब रागावतील, तुम्ही प्रवासाहून आल्या आल्या तुम्हाला स्वैपाक करावा लागला म्हणून. मी करते. असा किती वेळ लागणाराय ?"
 " अगं जा तू. काही रागवत नाहीत साहेब. मी सांगते त्यांना मी तुला पिटाळलं म्हणून. जा. खरंच जा."
 राम घरी येईल त्यावेळी ही नवराबायको घरी नसतील म्हणून ज्योतीला बरं वाटलं. काहीतरी विचित्र चाललंय इतपत त्यांना कळलंच असलं पाहिजे. बहुतेक इतर फ्लॅट्समधल्या नोकरांबरोबर त्याच्याबद्दल चर्वितचर्वणही झालं असणार. त्याची ज्योतीला परवा नव्हती. आणि ती आणि राम मोठमोठ्याने भांडणार किंवा एकमेकांना वस्तू फेकून मारणार अशीही फारशी शक्यता नव्हती. तरीही त्या दोघांच्या संवादाच्या वेळी तिसरं कुणी माणूस हजर असणार नाही ह्याचं तिला बरं वाटलं.
 साडेसात वाजले तरी राम आला नाही तेव्हा तिला जरा अस्वस्थ वाटायला लागलं. एकदा लवकरात लवकर काय ते बोलून संपवावं हे बरं. शिवाय जास्त वेळ जायला लागला तसं तिला आपले पाय इथे जास्त घट्ट रोवले जातायत असं वाटायला लागलं. शेवटी तिनं त्याला फोन करायचं ठरवलं. ह्यावेळी

१७० : साथ