पान:साथ (Sath).pdf/176

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तर खरंच काही झालं असलं आणि रामला माझ्या मदतीची गरज असली तर मी तेवढ्यापुरतं थांबेन."
 " त्याला फोन करून सांगू का तू येत्येयस म्हणून ?"
  " नको."
 विनी मोठ्याने हसली. " मी काही विनोदी बोलले का ?"
 " ज्यो, तू खरंच त्याला सोडण्याचा निर्णय घेतला असलास, तर अवचित येऊन त्याला धक्का देण्याचं कारण काय ? बरंय, भेटू आपण. बेस्ट ऑफ लक."
 जरा उशिराची बस घेऊन ज्योती दुपारी घरी पोचली. घरात कुणीच नव्हतं, तेव्हा ती आपल्या किल्लीनं कुलूप काढून आत गेली. आत गेल्या गेल्या दारातच उभं राहून तिनं सावकाश इकडे तिकडे बघून घेतलं, मग दार ओढून घेऊन ती बेडरूममधे गेली.आंघोळ करून तिनं एक सैल काफ्तान घातला. मग स्वैपाकघरात जाऊन टोस्ट आणि कॉफी बनवली. फ्रिज उघडून पाहिला तर त्यात पपई होती. त्याची एक फोड तिनं कापून घेतली. रामला पपई इतकी आवडत असे की रोज उठून पपई खायला त्याची हरकत नसे. फ्रिजमधे पपई असणं याचा अर्थ त्याचं आयुष्य तिच्याविना सुरळीत चाललं होतं.
 ती जेवण ट्रेवर घालून बैठकीच्या खोलीत घेऊन आली, आणि सकाळचा पेपर वाचीत तिनं ते खाल्लं. घरी येण्याच्या अनुभवाचा ती आस्वाद घेत होती. तिच्या मनात आलं, आणि मी स्वत:ला इथून हद्दपार करत्येय. खरंच का? की विनी म्हणतेय तसं मी स्वतःशीच एक लुटुपुटीचा खेळ खेळतेय ? तिनं जोराजोराने मान हलवली. छेः, तसं मुळीच नाही. खरं म्हणजे काही बदललं नाहीये. नुसतं बऱ्याच दिवसांनंतर घरी येण्याच्या अनुभवाने मी हळवी बनलेय. पण घर म्हणजे अमुकच वास्तू असं नसतंच मुळी. आणि मला माझ्या घराची आठवण होत होती तरी घराला माझी होत नव्हती हे कबूल करायला पाहिजे मला. बाईविना सुनं सुनं असं काही हे घर दिसत नाहीये. आपला अहंकार थोडासा

साथ: १६९