पान:साथ (Sath).pdf/157

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देशातलं राजकारण काहीही असलं तरी बहुसंख्य लोकांना आपापलं आयुष्य सुरळीतपणे जगता आलं पाहिजे नाहीतर देशात बेबंदशाही माजेल."
 ज्योतीच्या मनात आलं, स्मिताचं बरोबर आहे. हया सगळ्या सबबी आहेत. एखाद्या तत्त्वावर त्याचा पुरेसा विश्वास असता तर त्याच्यासाठी लढण्यापासून त्याला कुणीही परावृत्त करू शकलं नसतं. ती त्याच्याकडे विमनस्कपणे बघत होती, त्याच्यात तिला माहीत असलेल्या रामचा शोध घेत होती. तो राम परिणामाचा विचार न करता त्याला जे बरोबर वाटेल ते धडकून करायचा. कधी कधी रागाच्या भरात वेडंवाकडं करून बसू नको, मागनं पस्तावायची वेळ येईल असा तिलाच त्याला सबुरीचा सल्ला द्यावा लागायचा.
 आणि हा राम म्हणत होता, " तू माझ्याकडे असं का बघत्येयस ज्यो? तुला नाही का पटत की भलत्या ठिकाणी शूरपणाच प्रदर्शन करून आपली सबंध जीवनपद्धती धोक्यात टाकणं मूर्खपणाचं आहे म्हणून ?"
 " असेलही. मला नाही समजत.”
 पण रामचं तेवढ्यानं समाधान झालं नाही. तो म्हणाला, " त्यात न समजण्यासारखं काय आहे ?"
 " राम, महात्मा गांधींच्या खुनानंतर तुम्हाला आसरा देणारा बाबांचा मित्र त्याची आणि त्याच्या कुटुंबाची सुरक्षितता, कदाचित जीवितसुद्धा धोक्यात घालीत नव्हता का? मग त्याच चुकलं, तो मूर्ख होता असं का तुला म्हणायचंय?"
  " त्यावेळची परिस्थिती वेगळी होती."
 " काय वेगळी होती ?"
 " तो देशाच्या सरकारला आव्हान देत नव्हता. फक्त काही माथेफिरू गुंडांना देत होता. आणि त्याच्यावर काहीशे लोकांचं पोट अवलंबून नव्हतं."
 ज्योतीने काही न बोलता नुसतीच होकारार्थी मान हलवली.
 त्या वर्षीची वाढदिवसाची पार्टी मग बेत आखण्याच्या पुढे

१५० : साथ