पान:साथ (Sath).pdf/158

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सरकलीच नाही. त्या निमित्ताने फार दिवसांनी एकत्र आलेले ते सगळे पुन्हा दूर गेले. सगळं पचवण्याची सवय झालेली असूनसुद्धा हया निराशेने ज्योतीच्या मनाला एक न बुजणारी जखम केली.
 काही दिवसांनी स्मिताचा फोन आला, " ममी, कृष्णाकाका मला आणि प्रतापला रेलचेलमधे वाढदिवसाची पार्टी देणार आहेत. तू येशील?"
 ज्योती घुटमळली. निमंत्रण फक्त तिलाच होतं. अर्थात राम आलाच नसता. पण असं असताना मी मुलांच्या बर्थडे पार्टीला जातेय असं सांगून एकटीनं जायचं किंवा हे रामला फारसं आवडणार नाही हे माहीत असताना त्याला न सांगता जायचं हयातलं कोणतंच तिला प्रशस्त वाटेना.
 " तुला यायचं नसलं तर नको येऊ."
 " यायचं नाही असं नाही स्मिता, पण..."
 " ठीक आहे."
 " स्मिता -"
 " ममी, डॅडींचं म्हणणं तुला पटतं तरी किंवा पटत नाही तरी त्यात मधला मार्ग काही असू शकत नाही. आणि तुला पटत नसलं तर तुझ्या बुद्धीप्रमाणे तुला वागायला पाहिजे. नुसतं आंधळेपणानं डॅडींच्या मागोमाग फरफटत जायचं असंच का तू आयुष्यभर करीत राहणार आहेस ?"
 मुलीनं आपल्याला असं बोलावं हे ज्योतीला फार झोंबलं. स्मिताला काहीही वाटत असलं तरी पूर्वी ती कधी अशा तऱ्हेने बोलली नव्हती. आपल्या श्रद्धा नेमक्या काय आहेत हे तपासून पाहण्याची आईच्यात कुवत नाही, ती बावळटासारखी स्वत:ची फरफट होऊ देते असं म्हणून शहाणपणाचा आव आणून तिला सल्ला देण्याचं धाडस आतापर्यंत तिनं केलं नव्हतं.
 ती स्मिताच्या पार्टीला गेली नाही, आणि कृष्णाला भेटून त्याची क्षमा मागण्याचा निश्चय पण तिनं अमलात आणला नाही. हयानंतर स्मिता कधी त्यांच्याकडे आली नाही, आणि ज्योती तिला भेटायला गेली नाही. एक दिवस स्मिताच्या घरमालकिणीचा

साथ: १५१