पान:साथ (Sath).pdf/156

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 " धोका ? कशाचा?"
 " कदाचित तुरुंगाचासुद्धा."
 ज्योती म्हणाली, " काहीतरीच काय राम?"
 " काहीतरीच नाही. हल्ली कुणालाही कसल्याही थातुरमातुर कारणावरून तुरुंगात टाकताहेत."
 स्मिता म्हणाली, " कृष्णाकाकांशी संबंध ठेवल्याबद्दल जर मला कुणी तुरुंगात टाकणार असलं तर खुशाल टाकावं."
 " तुझं ठीक आहे. तुझ्यावर कुणी अवलंबून नाही. पण आम्ही जे करतो त्याचा परिणाम आमच्या कामगारांना भोगावा लागेल. समजा सरकारने आमची इंडस्ट्री बंद केली तर ते बिचारे काय करणार?"
 स्मिता त्यावेळी काही बोलली नाही, कारण लहानपणी वाटत असलेली रामच्या रागाची तिची भीती अजून पुरी गेली नव्हती. पण ज्योतीजवळ मात्र ती रागाने म्हणाली, " आपली कातडी बचावायला डॅडी कामगारांचं बुजगावणं पुढे करताहेत."
 कामगारांची आपल्यावर जबाबदारी आहे हे ज्योतीला कबूल होतं पण तरी रामचं करणं तिला पटत नव्हतं. रामची बाजू घेऊन स्मिताशी ती वाद घालू शकली नाही. नंतर ज्योतीला जे कळलं ते स्मिताला माहीत झालं असतं तर स्मिता आणखीच खवळली असती.
 ज्योतीला रामच्या बोलण्यातून एक शंका आली होती. ती नंतर म्हणाली, " राम, तू कृष्णाला आपल्याकडे यायला बंदी केलीस का? म्हणून तो इतके दिवस आला नाही ?"
 " हो."
 " असं तुझ्यानं करवलं तरी कसं? त्याला काय वाटलं असेल ?"
 " त्याला काही वाटलं नाही. तेवढा तो समंजस आहे. शेवटी त्याला पटतं की आपलं आयुष्य धोक्यात घालायचा त्याला काही हक्क नाही. आणि सगळेच काही राजकारण करीत नाहीत, राजकारणापासून दूरच राहतात हेही त्याला माहीत आहे. शेवटी

साथ: १४९