पान:साथ (Sath).pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चिकटायचा तो सोडायचाच नाही. त्याला कडेवर घेऊन तिला इकडे तिकडे करावं लागायचं. अंघोळ करून येते म्हणून खाली ठेवलं की हातपाय आपटून मोठमोठ्याने रडायला लागायचा तो ती मोरीतून बाहेर येईपर्यंत. एरवीसुद्धा एवढंसं मनाविरुद्ध झालं की आक्रस्ताळेपणा करायचा. त्याला एकदम असं काय झालं ते ज्योतीला कळेना. आपण कामाचा वेळ कमी करून त्याच्याबरोबर थोडा जास्त वेळ काढला तर कदाचित तो वळणावर येईल असा ती विचार करायला लागली.
 राम म्हणाला, " मला नाही वाटत तू तसं करावंस म्हणून. एकदा हातपाय आपटून गळा काढला की हवं ते मिळतं असं त्याला समजलं की मग त्याच्या हट्टीपणाला अंतच रहाणार नाही. मग तू त्याच्या लहरीची गुलाम होऊन बसशील."
 " तो फक्त दोन वर्षांचं मूल आहे, राम. तू म्हणजे अगदी तो हे सगळं कळून-सवरून करतोय अशा तऱ्हेनं बोलतोयस."
 " त्याला कळत नाही असं तुला वाटतंय ? काही नाही, मुलांना फार लहानपणापासून ही समज येते. आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी आईबापांना कसं वाकवायचं ते त्यांना बरोब्बर कळतं."
 " पण आईनं आपल्याकडे जरा जास्त लक्ष द्यावं, आपल्याबरोबर जरा जास्त वेळ घालवावा अशी मागणी मुलानं करणं अनैसर्गिक आहे का?"
 " विशिष्ट मर्यादेपर्यंत अशी मागणी अनैसर्गिक नाही. पण तू पहिल्यापासून त्याच्याबरोबर जितका वेळ घालवत असस तेवढाच आता घालवतेस. काही कमी नाही. मग एकदम आताच तो असं का वागायला लागला? काही नाही, तू मुळीच त्याचा हट्ट चालवून घेऊ नको. मग पुढे तुलाच पस्तावायची पाळी येईल."
 कदाचित ह्या वयात सगळी मुलं असं करीत असतील, पण प्रतापचं वागणं आपोआपच हळूहळू निवळलं एवढं खरं.
 राम अर्थातच म्हणाला, " बघ, मी सांगितलं नव्हतं तुला? माझंच बरोबर होतं. मुलांची अधिकारशाही ऐकून घेतली नाही

साथ: ११५