पान:साथ (Sath).pdf/122

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करणार तू ?"
 तिला त्याच्या विचारण्याचं जरा आश्चर्यच वाटलं. ती म्हणाली, " लवकरच करीन. बाळाला संभाळायला कोणी तरी पहावं लागेल ना?"
 "एक बाई पाहून ठेवलीय. स्वच्छ नि हसतमुख वाटते मला. तुझी गाठ घ्यायला सांगतो तिला, मग तुला बरी वाटली तर लगेच कामाला लाव, थोड्या दिवसांत सगळं शिकली म्हणजे तुला कामाला सुरुवात करता येईल."
 ज्योतीला वाटलं, आपण कितीही जोराने धावलो तरी राम सदा आपल्यापुढे काही पावलं असतोच. एकीकडून तिला हायसं वाटलं. तिची आई म्हणाली होती, आणखी काही महिने तरी तू काही परत कामाला लागणार नाहीस. तू बघ, राम तुला काम करू देणार नाही. घरी राहून मुलाला संभाळ म्हणेल. पुरुषांचं असंच असतं. ते स्वतः त्या मुलाचं तोंडही पहाणार नाहीत, पण बायकोनं त्याची हेळसांड करता कामा नये. त्यातून मुलगा असला तर विचारायला नको."
 सुदैवाने रामची मतं तिच्या आईच्या अपेक्षेसारखी निघाली नाहीत. महिनेन महिने घरी रहायचं म्हणजे मरणच. पण तरी रामने तिच्या आयुष्याची अशी सगळी आखणी करावी, तिला काही न विचारता बाई बिई बघूनसुद्धा टाकावी हेही तिला जरा खटकलं. मग तिनं स्वतःला समजावलं. ह्यात खटकण्यासारख काय आहे ? तू आपणहून जो निर्णय घेतला असतास तोच त्यान तुझ्यासाठी घेतला तर त्यात तक्रार करायला कुठे जागा आहे ?
 प्रताप तीन आठवड्यांचा असताना अर्धा दिवस आणि दीड महिन्यांचा असताना सबंध वेळ कामाला तिने सुरुवात केली. तो न रडता, हट्ट न करता एकटा रहायचा. पण सुमारे दोन वर्षांचा असताना तो एकदम हट्टीपणा करायला लागला. तिने भरवल्याशिवाय जेवणार नाही म्हणून हटून बसायचा. तिला कितीही उशीर झाला तरी ती घरी येईपर्यंत बाहेरच्या पायरीवर बसून तिची वाट बघत रहायचा. ती घरी आली की तिला जो

११४ : साथ