पान:साथ (Sath).pdf/113

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पटीने जास्त आहे. तुमच्याइतकेच किंवा तुमच्यापेक्षा जास्त कष्ट करणाऱ्या कितीकांना तुमच्याचा दहावा हिस्सासुद्धा यश मिळत नाही कारण ह्या इतर गोष्टींचं त्यांना पाठबळ नसतं."
 "कोण उदाहरणार्थ ? "
 " लांब कशाला जा? तुमच्या कारखान्यातले कामगारच."
 " कामगार आम्ही घेतो ते धोके पत्करत नाहीत. आम्ही त्यांना धंद्यात भागीदारी देऊ केली पण त्यांना ती नकोय. धंदा तोट्यात का चालेना, त्यांना त्यांचा सबंध पगार, बोनस, प्रॉव्हिडंट फंड सगळं हवंच. त्यातलं काहीही सोडायला ते तयार नाहीतच, पण संपाच्या धमक्या देऊन वाढवून मात्र घेणार. मग कसलाही धोका पत्करायला जर ते तयार नाहीत तर नफ्यातला भरपूर वाटा त्यांना का मिळावा ?"
 " धोका पत्करणं त्यांना परवडणारच नाही. धंदा चांगला चालला नाही तर ते उपाशी मरतील. तुमचं तसं नाहीये. धंदा जरी बुडला तरी व्यक्तिशः तुम्हाला ते जाणवणारसुद्धा नाही; कारण तुम्ही त्यातनं पुरेसे पैसे काढून स्वतःची आर्थिक स्थिती मजबूत केली आहे."
 " ते अगदी अलिकडे. पहिल्यांदा आम्ही शक्य तेवढे सगळे पैसे धंद्यात टाकत होतो. एकदा अशी वेळ आली होती की वसुलीसाठी बँकेनं आमच्या घरावर, जमिनीवर जप्ती आणली असती तर आमचं सगळंच गेलं असतं."
 प्रताप हसला. " ही अशी आपली तुम्ही स्वतःची समजूत करून घेतलीय. आपल्या आयुष्यात काहीतरी नाट्यमय घडतंय अशी कल्पना छान वाटली. आपलं जादा थ्रिल. ममी, तुला माहीताय बँका तुमच्यासारख्यांवर जप्ती आणत नाहीत. सोन्याचं अंडं देणारी कोंबडी ते कशाला मारून टाकतील?"
  राम इतका वेळ गप्प बसून ऐकत होता. तो म्हणाला, " ज्यो, तू कशाला त्याच्याशी निष्कारण वाद घालतेस ? त्यात काही अर्थ नाही हे तुला अजून कळलं नाही का ? "
 " रामचं बरोबर आहे. तुझ्याशी वाद घालणं निष्फळ आहे

साथ : १०५