पान:साथ (Sath).pdf/114

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कारण आमची बाजू समजून घेण्याची तुझी इच्छाच नाहीये. फक्त एकच गोष्ट मला सांगायचीय. तुला जर आमच्याबद्दल असं वाटत असलं तर तू इथे कशाला येतोस ? आम्हाला वाममार्गाने, लायकी नसताना मिळालेल्या संपत्तीचा उपभोग घेऊ नये असं नाही का वाटत तुला?"
 ह्यानंतर मात्र तो बरेच दिवस आला नाही. मग ज्योतीचं मन तिला खायला लागलं. आपण इतकं तोडून बोलायला नको होतं. काही झालं तरी मूलपणा आहे त्याच्यात अजून. त्याचं बोलणं इतकं लावून घ्यायला नको होतं.
 एक दिवस त्याने तिला ऑफिसात फोन केला, जेवायला कुठेतरी भेट म्हणून. खरं म्हणजे तिनं डबा आणला होता, आणि तिला फारसा वेळही नव्हता. तरी ती वेळ काढून गेली. मग हे नेहमीचंच झालं. दर काही दिवसांनी तो फोन करायचा. प्रथम तिनं स्वतःला सांगून पाहिलं की मला भेटायच्या आचेनं तो येतो. पण स्वतःची फसवणूक करणं तिच्या स्वभावात नव्हतं. तो आपल्याला भेटायला येतो तो फक्त पैसे मागायला हे तिला कळून चुकलं. एखाद्या वेळी तिला वाटायचं, त्याने फोन केला की त्याला विचारावं, किती पाहिजेत ? आणि तेवढे पाठवून द्यावे किंवा नेऊन द्यावे. उगीच बरोबर जेवण घेण्याचा देखावा कशाला ! त्याचाही पुन्हा भुर्दंड तिलाच. पण असं करणं तिच्यानं झाल नाही. त्याला खरं म्हणजे त्याच्या गरजांपुरेसा पगार होता. तेव्हा वरच्यावर माझ्याकडून पैसे कशाला मागतोस असं खडसून विचारता आलं असतं पण ते तिनं विचारलं नाही. पैसे कशासाठी हवेत हेही तिनं विचारलं नाही.
 एकदा तिला वाटलं की त्याला काहीतरी ठराविक रक्कम दर महिन्याला द्यावी. पण ती घेऊन वर आणखी पैसे त्यान मागितले नसते याची काही हमी नव्हती. खरं म्हणजे त्याला पैसे द्यायचे हेच तिला पटत नव्हतं. रामला तर मुळीच पसंत पडलं नसतं. तेव्हा ती रामच्या अपरोक्ष, त्याला नकळत हे करीत होती हयाचंही तिला वाईट वाटत होतं. पण पैसे आपण दिले

१०६ : साथ