पान:साथ (Sath).pdf/112

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करून मिळविलेले आहेत."
 " ठीक आहे, त्याबद्दल आपण वाद घालूया नको. नाहीतरी जेवणाच्या आधी वादावादी करणं पचनाला चांगलं नसतंच."
 तिनं त्याच्या स्मिताला प्रत्युत्तर दिलं नाही. तिला राग आला होता. सगळ्याचाच राग आला होता. त्याची फाटलेली विटलेली जीन आणि खादीचा कुडता, न कापलेले विस्कटलेले कधी कंगवा लागला असेल की नाही असं वाटणारे केस, त्याची दाढी, त्याच्या खांद्यावर अखंड लटकलेली मळकट शबनम पिशवी – एकदा तिनं त्याला विचारलं होतं ही तू कधी धूत नाहीस का, आणि तो प्रचंड आश्चर्याने म्हणाला होता, धुवायची कशाला ? – रेलून हातपाय पसरून खुर्चीत बसण्याची त्याची तऱ्हा, आणि ज्याला तो आपलं आयुष्याचं तत्त्वज्ञान म्हणायचा ती अनेक राजकीय - आर्थिक तत्त्वांची खिचडी.
 ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तक्रारी करण्यात रामने पुष्कळ रक्त आटवलं होतं. अर्थात आपल्या बापाच्या कुठल्याही मतांशी प्रतापला काही देणं-घेणं नव्हतंच. फक्त एकदा रामने रागाच्या भरात फारच आरडाओरडा केला तेव्हा तो म्हणाला होता, " मी जसा आहे त्याची तुम्हाला लाज वाटत असली तर मी पुन्हा इथे येणार नाही, आणि मी तुमचा मुलगा आहे म्हणून लोकांना सांगणार नाही." पण तो घरी येतच राहिला. मग एकदा त्याने त्यांची आळशी श्रीमंत म्हणन संभावना केली तेव्हा मात्र ज्योतीन त्याला फटकारलं.
  " आमच्याकडे आज जे सगळं आहे ते आमच्या आईबापांनी मागे ठेवलेलं नाही, त्यातला पैसा न पैसा आम्ही स्वतःच्या कष्टान मिळवला आहे."
 " कष्ट आणि जात, शिक्षण, समाजातलं स्थान ह्यांचे फायदे."
 " त्याबद्दल तू काही आम्हाला दोष देऊ शकत नाहीस. "
 " पण तुमच्या यशात ह्या गोष्टींचा वाटा आहे हे कबूल न करण्याबद्दल मात्र मी जरूर तुम्हाला दोष देतो. तुम्हाला मिळालेलं यश हे तुमच्या कष्टांच्या प्रमाणात नाही, त्याच्या कितीतरी

१०४ : साथ