पान:साथ (Sath).pdf/111

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हा मुलगा एकाएकी इतका परका कसा झाला हे तिला कधी कळलं नाही. त्याच्या मनाचा ठाव घेणं तर राहिलंच पण त्याला प्रेमानं स्पर्श करणंसुद्धा आता तिला शक्य झालं नसतं.
 " डॅडींनी सांगितलं का मी कुठेय ते?"
  "जरा दबाव आणावा लागला त्यांच्यावर, पण शेवटी सांगितलं."
  " म्हणजे?"
 त्यानं खांदे उडवले. " मी म्हटलं मला तुझ्याशी बोलायचंय. ते म्हणाले तू घरी नाहीयेस. मी विचारलं तू परत कधी येणार? तेव्हा ते म्हणाले त्याच्याशी तुला काय करायचंय. तेव्हा मग मी म्हटलं मला तुझा काही महत्त्वाच्या बाबतीत सल्ला विचारायचाय. ते म्हणाले नंतर विचारता येणार नाही का. मी म्हटलं नाही. शेवटी त्यांनी सांगितला तुझा पत्ता. आता त्यांच्यासारखा जबाबदार बाप मुलाच्या गरजेच्या वेळी त्याला मदत करणार नाही तर काय करणार?" तो हसला. " त्यांना नक्की वाटतंय की मी कोणा मुलीच्या प्रेमात पडलोय आणि तिच्याशी लग्न करावं की नाही ह्याबद्दल तुझा सल्ला विचारायचाय. आणि लग्न हा दारूच्या व्यसनापासून होमोसेक्शुॲलिटीपर्यंत सर्व गोष्टींवर रामबाण उपाय आहे असं मानणाऱ्यांपैकी ते असल्यामुळे माझं लग्न व्हावं अशी त्यांना तीव्र इच्छा असणं साहजिक आहे."
 त्याचं बोलणं तिला बोचलं कारण तिला पुष्कळदा एखादी शहाणी मुलगी ह्याच्याशी लग्न करून ह्याला सरळ करील तर किती बरं होईल असं वाटायचं.
 ती म्हणाली, "तू गलिच्छ भाषा केवळ दुसऱ्यांना धक्का देण्यासाठी वापरतोस का?"
 " माझ्या भाषेत गलिच्छ काय होतं बुवा ?"
  "जाऊ दे. चल, जेवायला चलतोस ना?"
 तो पुन्हा हसला. "मी वाटच बघत होतो तू विचारतेस की नाही म्हणून. नसतंस विचारलं तर मला माझे कष्टाने मिळवलेले पैसे खर्चून जेवावं लागलं असतं."
 "हे बघ प्रताप, एक लक्षात ठेव. माझे पैसे तुझ्याइतकेच कष्ट

साथ: १०३