पान:साथ (Sath).pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असतानाच्या एका क्षणी तिनं पक्का निश्चय केला. जेवणापूर्वीची ड्रिंक्स घेताना आणीबाणीचा विषय निघाला. कुणीतरी रामला विचारलं, "तुम्ही सेलबर्नचं पुस्तक वाचलं का? माझ्या मते आणीबाणीवरच्या सगळ्या पुस्तकांत ते सरस आहे. तुम्हाला काय वाटतं ?"
 राम म्हणाला, " तो प्रांत माझ्या बायकोचा आहे. मी वाचतबिचत नाही. मी आपला बिचारा अडाणी शेतकरी आहे."
 अर्थात त्या वर्तुळातल्या लोकांच्या कपाटात जी पुस्तकं दिसायला पाहिजेत ती तो आवर्जून विकत घ्यायचा, त्यातच त्याने आणीबाणीबद्दल प्रसिद्ध झालेली सगळी पुस्तकं घेतली होतीच. वर्षातनं दोनेकदा तो मॉडर्न बुक डेपोत जायचा आणि दुकानाच्या मालकांशी पुस्तकांबद्दल आपण त्यातले दर्दी असल्यासारखं चर्चा करीत एकीकडे शेल्फांतली पुस्तकं चाळायचा. पण खरं म्हणजे हा नुसता देखावा असायचा. पुस्तकं चाळण्याची त्याला काही गरज नसे; कारण दुकानात पाय ठेवतानाच काय काय घ्यायचं हे त्याचं ठरलेलं असे. तो वाचनावर इतका कमी वेळ खर्च करायचा की, उत्तम पुस्तकांच्या बरोब्बर याद्या करण्यातल्या त्याच्या कौशल्याचं ज्योतीला कौतुक वाटायचं. पुस्तकं विकत आणल्यावर तो एखादं सबंध वाचायचा, थोडीशी नुसता चाळायचा आणि बहुतेक सगळी तशीच ठेवून द्यायचा. ज्योतीनं पुस्तकं वाचून त्याबद्दल काही म्हटलं, की ते लक्षात ठेवून पुढे कधीतरी संभाषणाच्या ओघात ते जणू काही आपण स्वतः वाचून बनवलेलं मत आहे, अशा तऱ्हेने तो मांडायचा. मात्र मी ते पुस्तक वाचलंय, असं धडधडीत खोटं विधान त्यानं कधी केलं नाही. एखाद्या पुस्तकाबद्दल काही बोलता आलं नाही-म्हणजे ते ज्योतीनं वाचलं नसलं किंवा त्या दोघांचं त्याबद्दल काही बोलणं झालं नसलं तर-की मग तो साध्याभोळया अडाणी शेतकऱ्याचं कातडं पांघरायचा. पण त्याच्याआडून त्याचा रोख स्पष्ट असायचा. पुस्तकं वाचण्यासारख्या थिल्लर गोष्टी करायला वेळ नसतो मला.

 नवऱ्याचे तेच तेच विनोद ऐकणाऱ्या बायकोसारखं एक खोट्या

साथ: ५