कौतुकाचं हसू तोंडावर ओढून ज्योतीनं हे पन्नासदा ऐकून घेतलं होतं. पण आज तेच ऐकल्यावर तिनं एकदम ठरवलं, हे आता बास! ह्यातनं बाहेर पडायचंय मला. सगळ्याचाच उबग आलाय. तो खोटेपणा, काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी घातलेले मुखवटे, सरळ साध्या संभाषणाऐवजी चालणारे छुपे टोले आणि प्रतिटोले, सुसंस्कृततेच्या बुरख्याखाली एकमेकांवर कुरघोडी करण्याचे सतत चाललेले प्रयत्न. सगळया-सगळ्याचाच वीट आलाय.
ती म्हणाली, " हे एकाएकी नाहीये, राम. हयाची तुला काही तरी कल्पना आली असली पाहिजे.”
" तशी अलीकडे तू जरा चिडचिड करत्येयस असं वाटलं मला, पण मला वाटलं ते कामाच्या ताणामुळे. वर्ष-अखेर आलीय त्यामुळे खूप काम पडतं तुला, होय ना? खूप दमत असली पाहिजेस.”
" कामाचं नाही मला काही वाटत."
"मग काय झालंय तुला?"
तिच्या मनात आलं, अलीकडे आपल्या वारंवार होणाऱ्या मतभेदांतून, वादांतून काहीच का कळलं नसेल हयाला ? हया पार्टीबद्दलच त्यांचा वाद झाला होता.
ती म्हणाली होती, " राम, ही पार्टी दिलीच पाहिजे का?"
" अर्थात." त्याच्या आवाजात खूप आश्चर्य होतं. "
म्हणजे मला एवढंच म्हणायचं होतं की, हया लोकांना तू एखाद्या रेस्टॉरंटमधे किंवा क्लबमधे बोलावू शकणार नाहीस का?"
" त्यात नि घरी बोलावण्यात फरक आहे, ज्योती. तूही कबूल केलंयस ते. आपण खूप मागेच ठरवलं होतं की, घरी बोलावलेलं लोकांना जास्त आवडतं. विशेषतः परदेशी माणसांना. आणि हे दोघं आपल्या खूप उपयोगी पडणार आहेत."
"कबूल आहे रे मला, पण आज पार्टी द्यायचा माझा मूडच नाहीये."
"पण तुला त्याची काही कटकट होणार नाही. हव तर तू