पण असा प्रसंग पूर्वी कधी आलाच नव्हता तेव्हा त्याबद्दल रामला काय वाटेल ह्याचा तिला अंदाज येण्याचं काही कारण नव्हतं. बहुतेक पुरुषांचा उदारमतवाद बायको जोवर ठराविक चौकटीत वावरतेय तोपर्यंतच टिकतो. मग तिला स्वतःचंच हसू आलं. त्या माणसानं बिचाऱ्यानं सरळपणे जेवायचं आमंत्रण दिलं. तेसुद्धा इथे होटेलातल्या डायनिंग रूममधे. त्यात काय एवढं खास ? शिवाय रामला काय वाटेल याचा विचार करण्याचं तिला काय कारण होतं?
ती म्हणाली, "ठीक आहे."
" जेवणापूर्वी ड्रिंक्स घेणार? "
" नको."
खोलीत गेल्यावर तिने तोंड धुतलं, तोंडावरून हलकेच पावडर फिरवली आणि केस विंचरून पुन्हा बांधले. मग साडी फारच चुरगळलेली दिसली म्हणून तिने एक खळ केलेली चुरचुरीत साडी पेटीतनं काढली.
डायनिंग रूममध्ये तो आधीच येऊन बसला होता, आणि ती बसेपर्यंत उठून उभा राहिला. दिव्याच्या उजेडात तिनं पाहिलं की तो तिला वाटलं त्यापेक्षाही कूरूप होता. त्याच्या पोटाच्या घेरावरून त्याचा सदरा ताणला गेला होता त्याच्या चेहऱ्याची कातडी मुरुमांनी खरबरीत झाली होती, आणि कपाळावर हळूहळू टक्कल पडत चाललं होतं.
जेवताना त्याने तिला विचारलं, " तुम्ही ह्या बी-बियाण्याच्या लाइनमधे कशा काय पडलात ?"
" पडले हे बरोबर आहे. माझ्या सासऱ्यांचा बिझनेस होता. छोटाच होता आधी, मग आम्ही वाढवत नेला."
" तुम्ही नक्की काय करता?"
" मुख्य म्हणजे अकाऊंट्स बघते."
" तो कुठल्याही धंद्याचा फार महत्त्वाचा भाग असतो. हे मला वाईट अनुभवावरनं कळलंय."
तिला एकदम जाणवलं की तो कोण आहे, काय करतो
पान:साथ (Sath).pdf/104
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९६ : साथ
