पान:साथ (Sath).pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हयाबद्दल तिनं त्याला काहीच विचारलं नव्हतं.
 " तुम्ही काय करता? "
 "मी इंपोर्ट - एक्सपोर्टमधे आहे. चामड्याच्या वस्तू, तयार कपडे, कॉस्ट्यूम ज्युवेलरी एक्सपोर्ट करतो. पण ह्यात पडायच्या आधी मी काही कारखान्यांसाठी सुटे भाग बनवत होतो. माझा एक वर्कशॉप होता. तसा धंदा चांगला चालला होता, म्हणजे माझी बाजू मी संभाळीत होतो - मी इंजिनियर आहे - पण अकाउंट्सची बाजू लंगडी पडली. फार पगार द्यावा लागतो म्हणून चांगला ट्रेंड अनुभवी माणूस नेमला नाही. ती काटकसर महागात पडली. कच्च्या मालाच्या खरेदीपासून पार्ट बनवण्यापर्यतचं कॉस्टिंग, वेळच्यावेळी बिलं करणं, ती लवकर वसूल होतात की नाही याच्यावर नजर ठेवणं, तगादे लावणं ही कामं होत नव्हती. शेवटी तोटा इतका वाढायला लागला की तो भरून काढून पुन्हा मी आपल्या पायावर उभा राहीन ह्याची शक्यताच राहिली नाही. मग बंद करायचं ठरवलं. माझा एक मित्र हया इंपोर्ट - एक्सपोर्टमधे होता. त्यानं मला नोकरी आणि पार्टनरशिप देऊ केली. अर्थात त्या वेळी माझ्याकडे गुंतवायला पैसे नव्हतेच, पण आता माझी गुंतवणूक जवळजवळ निम्मी झालीय. त्यानं संकटात मला हात दिला त्याची भरपाई मी खूप कष्ट करून मला मिळालेले शक्य तेवढे पैसे धंद्यात गुंतवून केलीय." तो थोडासा हसला. " गोष्टीचं तात्पर्य एवढंच की तुमचं महत्त्व कमी लेखू नका. तुमच्या धंद्यातल्या यशाचा सगळ्यात मोठा वाटा तुमचा आहे."
 ज्योतीनं एक सुस्कारा सोडला. " माझा नवराही मला तेच सांगतो."
 पण ते तिला पुरेसं वाटत नव्हतं. थातुरमातुर सुरुवातीपासून धंदा आकाराला आणताना तिला जो हे माझं कर्तृत्व आहे असा अभिमान वाटत असे, तो आता वाटत नव्हता. त्रिवेणी सीड्सची वार्षिक उलाढाल आता दोन कोटीपर्यंत पोचली होती आणि त्यांचं कार्यक्षेत्र चार राज्यांत पसरलं होतं. तिच्या आयुष्याची सव्वीस वर्ष तिनं हया कामाला दिली होती आणि मागे बघताना

[७]

साथ : ९७