पान:साथ (Sath).pdf/103

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 “ बी म्हणून वापरत नाही त्याचं शेतकरी काय करतो?"
 " खायला वापरतो किंवा गुरांचं आणि कोंबड्यांचं खाद्य करण्यासाठी विकतो.”
 " मी फारच अडाण्यासारखे प्रश्न विचारतोय असं तुम्हाला वाटत असेल ना? पण मला बियाणाच्या धंद्याबद्दल काहीच माहिती नाही. तुम्ही सांगताय ते फारच इंटरेस्टिग आहे. म्हणजे आपण भाजी-भाकरी खातो त्याच्यामागे इतके कष्ट असतील असं शहरातल्या माणसाच्या डोक्यात येत नाही."
 खरं म्हणजे त्याने प्रश्न विचारले हे ज्योतीला आवडलं होतं. आपण सहज आत्मविश्वासानं अशा प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो हयाचा तिला अभिमान वाटला. एरवी नवीन माणूस भेटायचं म्हणजे राम असतानाच. प्रश्न त्यालाच विचारले जायचे आणि उत्तरंही तोच द्यायचा. तो नेहमी 'आम्ही' म्हणायचा पण पाहुणे तिच्याकडे पहिला नमस्कार ठोकल्यावर दुर्लक्ष करायचे. तिच्याकडे रामची बायको म्हणून पहायचे, सहकारी म्हणून नाही. पण ह्याचा दोष ती केवळ रामला देऊ शकत नव्हती. दोष द्यायचाच तर दोघांना सारखाच द्यायला हवा होता, कारण पहिल्यापासूनच तिने प्रत्येक गोष्टीत रामला पुढाकार घेऊ दिला. खरं म्हणजे घेऊ दिला असंही नव्हे. त्याने घेतला आणि तिने त्याबद्दल काही आक्षेप घेतला नाही, किंवा स्वतःहून कशात पुढाकार घेण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित हेच चुकलं असेल. आयुष्याला ठरवून आखून मुद्दाम आकार द्यायला पाहिजे होता. ते आपलं घडतंय तसं घडू द्यायचं असं नाही करता कामा.
 तिच्याबरोबरचा माणूस म्हणाला, " आपण बरोबर जेवण घेऊन जेवता जेवता आणखी गप्पा मारू या. चालेल तुम्हाला? अरे हो, एक राहिलंच. माझं नाव आदित्य रेगे "
 " ज्योती देशमुख."
 त्याचं निमंत्रण स्वीकारावं की नाही, ते रामला कितपत आवडेल याचा ती विचार करीत होती. खरं म्हणजे त्याला आवडणार नाही असं दर्शवणारं काहीच तो कधी बोलला नव्हता.

साथ : ९५