पान:साथ (Sath).pdf/102

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

करीत होती की त्याने तिचं बावळटासारखं पळणं , पडणं पाहिलं असलंन तर त्याला तिच्याबद्दल काय वाटलं असेल. केवळ त्याची सोबत असल्यामुळे आपली भीती पार पळून गेलीय आणि आपल्याला अगदी निर्धास्त वाटतंय हया गोष्टीची तिला लाज वाटली.
 तो म्हणाला, " दुपारी तुम्हाला भेटायला माणूस आला होता त्याचं न तुमचं बोलणं मी ऐकलं."
 " त्यात काही गुप्त ठेवण्यासारखं नव्हतं.”
 " तसं नाही. पण लोकांना नकळत त्यांचं बोलणं ऐकणं सभ्य समजत नाहीत. तरी आता ऐकलंच आहे तर तुम्हाला त्याबद्दल आणखी विचारलं तर चालेल? तुम्ही कुठल्या लाइनमधे आहात?"
 "बी-बियाणं.”
 "कसलं?"
 " धान्य, कडधान्य, कापूस, काही भाज्या."
 " म्हणजे तुम्ही विकत घेऊन फेरविक्री करता का?"
 " नाही. तयार करतो, पण स्वतःच्या जमिनीवर नाही. इतरांकडून आमच्या देखरेखीखाली करवून घेतो."
 " म्हणजे नक्की कसं?"
 " शेतकऱ्यांशी करार करतो. आम्ही त्यांना फाउंडेशन सीड, आणि कधी कधी खतं, औषधं वगैरे देतो. मग आमचा माणूस पिकाची ठराविक वेळांना तपासणी करतो, पिकाच्या काढणीच्या वेळी हजर रहातो. काढणी झाली की ते आमच्याकडे आणून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. म्हणजे कचरा वगैरे काढून बी साफ केलं जातं. मग त्याला चाळणी लावून जे ठराविक आकारापेक्षा कमी असेल ते शेतकऱ्याला परत केलं जातं. जे बी म्हणून वापरण्याजोगं असेल त्याला बुरशीनाशक औषधं लावून ते पिशव्यांत भरून त्याला लेबल लावलं जातं. आम्ही जे बी म्हणून स्वीकारतो त्याचे किलोमागे कराराप्रमाणे पैसे शेतकऱ्याला दिले जातात.”

९४ : साथ