पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कळून चुकलं होतं.
 हा 'चमत्कार' घडलाच कसा, याचं खाँसाहेबाना, राहून राहून नवल वाटत होतं. आबासाहेबांनी अक्षरशः त्यांचा पुनर्जन्मच घडवला होता. सागराच्या तळाशी गेलेले हे सुवर्ण-माणिक, अनमोल सुवर्णरल, संगीत रसिकजनांच्या हाती सुखरूप आणून पोचवलं होतं.
 थोड्याच कालावधीनंतर खाँसाहेब अगदी पूर्वीसारखे गाऊ लागले. एक नाही, दोन नाही, तर तब्बल २८ वर्षे ते त्या आजारानंतर जगले. नुसतेच जगले नाहीत तर संगीत सम्राट म्हणून जगले. आबासाहेब सुरूवातीला त्याना म्हणाले होतेच. "तुमचं गाणं 'जगलं' तरच तुम्ही जगलात.”
 किती सार्थ होतं ते बोलणं!
 या प्रसंगानंतर खाँसाहेब आबासाहेबांच्या गणेशोत्सवात नित्यनेमाने येऊन गायला लागले. त्यांच्यामुळे अनेक गवई मंडळी आबासाहेबांच्या सान्निध्यात आली. त्यांच्या गणपतीपुढे भक्तिभावाने गाऊ लागली. त्यांच्या गणेशोत्सवाची कीर्ती सर्वदूर पसरली.
 आबासाहेबांची ओसरी म्हणजे एक गुणीजनांचा दरबारच होता. साधुदासांसारखा प्रतिभाशाली कवी, कोटणीसमहाराजांसारख्या सत्पुरूषापासून, तो शेताच्या बांधावरच्या दुर्मिळ वनस्पती घेऊन येणाऱ्या खेडुतांपर्यंत, सर्व जनांची त्यात अपस्थिती असे. गणपती मंदिरात पूजा सांगणारे सांबारे घराणे, पण खुद्द आबासाहेबांच्या वागण्यात स्पृश्य-अस्पृश्य, अच्च-नीच, श्रीमंत-गरीब असा भेद 'औषधा' पुरतासुद्धा नव्हता. प्राण जाण्याच्या भीतीने घाबरून गेलेले सर्व जाती-जमातीचे रोगी डोळ्यात 'प्राण' आणून आपल्या व्याधीवर आबासाहेब केव्हा अपचार करतील याची वाट पहात असत. आबासाहेब कधी कुणाची निराशा करीत नसत.

 खुद्द लोकमान्य टिळकांची आबासाहेबांवर श्रद्धा होती. आबासाहेबांचा पुण्यातही दवाखाना होता. आपल्या मधुमेहाच्या व्याधीसाठी लोकमान्य त्यांच्याकडून औषध आणवीत असत. १९२० च्या फेब्रुवारीमध्ये, ज्योतिष संमेलनाच्या निमित्ताने, लोकमान्य सांगलीस आले असताना आवर्जून सांबारेवाड्यात जाऊन आबासाहेबाना भेटून गेले. त्यांचा प्रचंड मोठा गणपती पाहून आश्चर्यचकित झाले. नंतर लोकमान्य अिंग्लंडमध्ये जायचे होते. म्हणून तिकडे जाताना आबासाहेबांकडून तीन महिन्याचे औषध घेऊन गेले होते पण दुर्दैवाने अिंग्लंडहून आल्यानंतर, त्याच वर्षीच्या १ ऑगस्टला त्यांचे निधन झाले. असं सांगतात की आबासाहेबानी लोकमान्यांची तब्येत तपासून त्याना


सांगली आणि सांगलीकर.................................................. ...७५