पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मग खाँसाहेब आबासाहेबांकडे आले.
 आबासाहेबानी काय जादू केली ते एक परमेश्वर जाणे. त्यांच्या अपचारानी खाँसाहेबाना खरोखरच थोडंथोडं बरं वाटू लागले. आराम पडू लागला. हळूहळू चालता-बोलतानाची धाप थोडीथोडी कमी झाली.
 पण गाणं गायचा धीर मात्र त्याना होईना.
 आबासाहेबानी सांगितलं तरी धीर होईना. गायचा प्रयत्न केला आणि पुन्हा काही झालं तर? ही भीती त्यांच्या मनात होती. तेव्हा स्वतः आबासाहेबानी प्रेमळपणे समजावलं, म्हणाले “अहो तुम्ही मोठे गवई. तुमचं गाणं जगलं तर तुम्ही जगलात. एरवी निर्माल्य होऊन जगण्यात आणि मरण्यात काय अर्थ आहे ?"
 अितकं सांगूनही खाँसाहेबांची भीती कमी झाली नाहीच.
 आबासाहेब संगीतप्रेमी होते. अस्सल जाणकार होते. ते स्वतः हार्मोनियम, पखवाज वाजवत. एकदा तेरदाळ मुक्कामी असताना त्यांचे स्नेही तात्यासाहेब कोटणीस यांच्याकडे राहिले. त्यांचे कीर्तन ऐकताना तात्यासाहेब थोडेसे तालाला कच्चे आहेत असे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा आबासाहेबानी स्वतः मेहनत घेऊन त्यांचे तालाचे अंग पूर्णपणे अव्यंग केले. म्हणजे अशी 'संगीत दुखणी' पण ते बरी करत! त्यामुळं कलाकाराच्या जीवनात, त्याच्या कलेचे स्थान किती विलक्षण महत्त्वाचं असतं, ह्याची त्याना जाण होती. खाँसाहेबांसारखा श्रेष्ठ कलावंत वाया जाऊ नये म्हणून ते त्यांची, त्यानी गावं म्हणून, अकसारखी मनधरणी करत होते. पण खाँसाहेब काही ऐकेनात. अखेरीस आबासाहेबानी आपला स्वर 'जरा वरच्या' पट्टीत लावला. त्यानी खडसावून सांगितलं “माझ्या औषधासाठी गाणे हेच पथ्य आहे. मी सांगतो तसं तुम्ही करणार नसाल, तर अद्यापासून माझं औषध बंद.'
 ही मात्रा मात्र एकदम लागू पडली!

 कारण आबासाहेब औषध बंद करणार म्हणजे ग्रंथच आटोपला !! " कयामत आली” असं म्हणत खाँसाहेबानी, गाण्याचा रियाझ करायला सुरवात केली. आबासाहेब स्वतः समोर बसत. एक-दोन मिनिटे गायचं नंतर पाच-सहा मिनिटे गायचं असा प्रयोग सुरू झाला. त्याना धाप लागण्याच्या आत आबासाहेब स्वतःच त्यांचं गाणं बंद करीत. मग हळूहळू आबासाहेबानी त्यांच्या गाण्याचा अवधी वाढवायला सुरवात केली. “आता आपल्याला धाप लागत नाही" हा दृढ विश्वास त्यांनी खाँसाहेबांच्या मनात निर्माण केला. (अर्थात त्याना स्वतःला तशी खात्री होतीच !) त्यातून अखादे वेळेस ढास लागलीच तर ती औषधाच्या एक दोन डोसांमध्येच थांबते हेहि खाँसाहेबाना


सांगली आणि सांगलीकर.................................................................. ७४