पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पोलिस स्टेशनवरून राजवाडा चौक, पटेल चौक, गणपती मंदिर, पाटील गल्लीतून सांबारे वाड्यात परत येई. रात्रीची मिरवणूक तर रात्री ९ वाजता सुरू होई ती पहाटे तीनपर्यंत चालत असे. गणपतीपेठेत हलवाई मंडळी, मिठाईची ताटेच्या ताटे, गणपतीवर अधळीत असत. रात्रीच्या मिरवणुकीनंतर शोभेचे दारूकाम हे फार मोठे आकर्षण असे. या कामात अग्रेसर असलेली कवठे एकंद गावची मंडळी, दोन दोन महिने आधी सांबारेवाड्यात येऊन भुसनळे, चक्रे, झाडे, औट अशी सर्वप्रकारची शोभेची दारू बनवीत. शिवाय वाजणारे फटाके तर अनेक प्रकारचे असत.
 या अत्सवातील एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे आबासाहेबानी करवून घेतलेले दोन हत्ती. असं सांगतात की, एका वर्षी सांगलीकर अधिपतीनी, मिरवणुकीसाठी हत्ती देण्याचं नाकारलं, म्हणून आबासाहेबानी आयेंने, कायमस्वरूपी दोन मोठे निर्जीव हत्ती बनविण्याचं मनावर घेतलं. कोल्हापूरातून मोठ्यात मोठ्या हत्तींची मापे आणवली. तरटे, कांबळी, अँगल्सचा वापर करून त्या हत्तींच्या मापाचे दोन मोठे हत्ती तयार केले. अत्तम तऱ्हेने रंगवले. सर्व प्रकारचे दागिने वगैरे घालून, सुशोभित झूल घालून त्या हत्तीना जेव्हा मिरवणुकीने नेले, तेव्हा मिरवणूक गणपती मंदिराजवळ आल्यावर, पूर्वी तिथे हत्तीठाण्याजवळ बांधत असलेला खरा हत्तीसुध्दा या 'हत्तीना' पाहून बावरला. घाबरून साखळदंड तोडायला लागला.
 आबासाहेबांचा गणेशोत्सव पूर्ण पाच दिवस चाले. मात्र आधी अल्लेख आल्याप्रमाणे दशमीपासून अनंतचर्तुदशीपर्यंत. पाच दिवस सतत गायन, भजन, जादूचे प्रयोग, कुस्त्या अशा अनेकविध कार्यक्रमांचा धूमधडाका असे. सांगलीवाडी, कवलापूर, कर्नाळ डिग्रज अशा जवळपासच्या गावातून भजनीदिंड्या येत. त्यांची भजने होत. बिदागीचा सवालच नसे. आबासाहेब आपल्याकडून औषधापोटी काही घेत नाहीत, तर त्यांच्या गणपती अत्सवात आपली जास्तीत जास्त सेवा रूजू व्हावी अशीच प्रत्येकाची अिच्छा असे. प्रत्येकाला मानाचा नारळ मिळे. रात्रभर कार्यक्रम आणि जोडीला सांगलीचे सुप्रसिद्ध कुरकुरीत भडंग आणि चहा. भडंगाची प्रसिद्धी आणि प्रथा तेव्हापासूनची आहे. 'भडंग' हे नामकरण आबासाहेबांचे चाहते सांगलीचे सुप्रसिद्ध कवी, साधुदास यानी केलं आहे, असं म्हणतात. या अत्सवात हजारो लोक जेवून जात. मग त्यात पंक्तिप्रपंच नसे.

 संस्थानच्या गणपतीउत्सवापेक्षाही हा अत्सव मोठ्या प्रमाणावर होई. आणि खऱ्या अर्थाने हा सर्व समाजाचा अत्सव असे. समाजाच्या सर्व थरातील माणसे ‘आपल्या' घरचा अत्सव आहे अशा भावनेने सामील होत. स्पृश्यास्पृश्य भेद नावापुरतासुद्धा नसे. कोणी खालच्या समाजातील माणूस संकोचाने बाजूला राहू पाही तेव्हा आबासाहेब


सांगली आणि सांगलीकर.................................................................... ७२