पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ग्रंथाचे परिशीलन ते करतच. पण समोर येणाऱ्या नवीन नवीन रोग्यांचा आणि त्यांच्या विविध व्याधींचा ते सतत अभ्यास करत. रोगाच्या लक्षणानुसार ते औषध तयार करत. आणि रोगाचेच नाव औषधाला देत. त्यानी दिलेल्या काही औषधांची नावे आधुनिक आयुर्वेदातील औषधांस तंतोतंत जुळतात. मात्र त्यानी स्वतः तयार केलेली काही औषधे, चूर्णे, आयुर्वेदात सापडत नाहीत. त्यांची औषधयोजना करण्याची पद्धती आधुनिक वैद्यकाप्रमाणे होती. पातळ औषधे ते स्वतः तयार करीत. अर्क पद्धतीस त्यानीच प्रथम सुरूवात केली होती. तुळस, गुलाब, धमासा, वाळा यांचे ते अर्क काढून ठेवत. रानतुळस ही फार औषधी म्हणून तिचा अर्क नेहेमी काढून ठेवत. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये ज्या ज्या ओल्या हिरव्या वनस्पती मिळत, त्यांचे अर्क आबासाहेब काढून ठेवत. आबासाहेबांच्या ओसरीवर अनेक खेडूत मंडळी येत. त्यांच्याबरोबर आबासाहेब स्वतः रानावनात जाऊन, वेगवेगळ्या वनस्पतींची पाहणी करून ठेवत. ही श्रध्दाळू खेडूत मंडळी आबासाहेब सांगतील, त्या त्या वनस्पतींचे भारेच्या भारे, त्यांच्या ओसरीवर आणून टाकत. निरनिराळी द्रव्ये आणून, त्यांचे काढे करून, त्यांचे व्यवस्थित, शास्त्रशुध्द जतन करण्यावर आबासाहेबांचा विशेष कटाक्ष असे.
 आबासाहेबांचं मोठं वैशिष्टय म्हणजे त्यानी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा कधीही दुरूपयोग केला नाही. सवंग व्यवसाय होऊ दिला नाही. एरवी त्यांच्या वाड्याच्या प्रशस्त ओसरीवर, सांगलीच्या शनिवारच्या बाजारासारखी गर्दी जमत असे. मग त्यात मोठमोठ्या सरकारी अंमलदारापासून अगदी अडाणी शेतकऱ्यांपर्यंत सर्वांचा समावेश असे. अितकेच काय चोर, रामोशीसुध्दा त्यांच्याकडून औषधे घेऊन जात. एकदा गंमतीची गोष्ट घडली. आबासाहेब एकदा सांगलीजवळील डिग्रज या गावी एका आज़ारी रूग्णाला पहायला गेले होते. येताना रात्र झाली. बंद सारवटगाडीतून ते सांगलीला परतीच्या वाटेवर होते. अचानक आजुबाजूच्या असाच्या फडातून, तीन- चार रामोशी आले. व्यापारी समजून लुटालूट करण्याच्या अद्देशाने त्यानी गाडी थांबविली. पहातात तो आबासाहेब. तत्काळ त्यानी त्यांचे पाय धरले. माफी मागितली. सांगलीपर्यंत पोचवले. अितकेच काय, पण जवळ असलेले गुळाचे रवे दिले. अर्था तो चोरीचा माल. मग आबासाहेब कसे घेतील?
 असे पण असायचे आबासाहेबांचे रूग्ण !

 आबासाहेब औषधाचे पैसे घेत नसत. प्रत्येक रूग्ण म्हणजे परमेश्वराने शिकण्यासाठी पाठवलेला नवीन 'धडा' आहे अशीच त्यांची समजूत असावी. रोग्याच्या आणि त्याच्या व्याधीचा ते सतत विचार करीत. आयुर्वेदाचे ग्रंथ अघडून संदर्भ शोधत. सतत चिंतन करीत. या अव्याहत अभ्यासानेच त्याना रोगाची अचूक


सांगली आणि सांगलीकर................................................................................. ७०