पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आबासाहेब म्हणजे त्यांच्याच काळात एक 'दंतकथा' बनून गेले होते! अनेक आयुर्वेदाचार्य, नुसता 'आबासाहेब सांबारे' या नावाच्या उच्चारानेच कानाच्या पाळीला हात लावून मनोमन नमस्कार करतात. जुने सांगलीकर त्यांच्याविषयी बोलायला लागले की त्यांच्या रसवंतीला आवर घालणे कठीणच.
 शाहू महाराजानी पैलवान बरा झाल्यावर बिदागी म्हणून चार चांदीची तबके भरून नाणी पाठविली. पण आबासाहेबानी बिदागी घेतली नाही. “मला पोटाला देणारा श्रीगजानन माझ्या घरातच आहे” असे नम्रतापूर्वक सांगून आबासाहेब महाराजाना म्हणाले, “फार तर तुमचा पैलवान पुन्हा कुस्त्या करायला लागल्यावर आमच्या गणपती अत्सवात येऊन कुस्त्या करू दे.” त्याप्रमाणे तो गुलामउद्दीन, आबासाहेबांकडील गणपतीच्या अत्सवात कुस्त्या करत असे. आबासाहेबानी कोल्हापूरात यावं अशी शाहूमहाराजांची खूप इच्छा होती. तेथे मोठे रूग्णालय बांधून द्यायची तयारी होती असं म्हणतात. पण एकदा सांगलीच्या राजेसाहेबांकडे, राजवैद्य म्हणून निष्ठा वाहिल्यावर त्यात आबासाहेब बदल करणे कदापि शक्य नव्हते.
 अशा या आबासाहेबांचं मूळ नाव कृष्णाजी विष्णु सांबारे. सांबारे हे काही त्यांच्या पूर्वजांचं मूळ नाव नव्हे. मूळचं आडनाव जोशी. तासगांव तालुक्यातील चिंचणी हे मूळ गाव. तिथं ही जोशी मंडळी पिढीजात भिक्षुकी आणि वैद्यकी हे दोन व्यवसाय अपजीविकेसाठी करत असत. सांगली संस्थानची स्थापना केल्यावर पहिले अधिपती श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यानी सांगलीचा नावलौकिक वाढावा या दृष्टिकोनातून अनेक शास्त्री, पंडित, गवई, पैलवान, व्यापारी मंडळी आदी विविध व्यवसायातील लोकांना सांगलीत वास्तव्यासाठी पाचारण केले. त्याना अनेक सवलती दिल्या. नोकऱ्या दिल्या. अपजीविकेची साधने दिली. या चिंचणीकर जोशी मंडळीना, सांगलीतील गणपतीच्या देवळात असणाऱ्या, चिंतामणेश्वराची म्हणजेच सांबाची पूजा, अदरनिर्वाहाचे साधन म्हणून दिली. सांबाची पूजा करणारे म्हणून त्यांचं आडनाव 'सांबारे' झालं. आजमितिलाही ही पूजा व्यवस्था सांबारे मंडळींकडेच चालू आहे.

 आबासाहेबाना दामोदरपंत आणि रामचंद्रपंत असे आणखी दोन भाऊ होते. तिघेही बंधू निष्णात वैद्य होते. आबासाहेबांच्या शिक्षणाविषयी फारशी माहिती अपलब्ध नाही. तथापि त्यांचे काही वैद्यकीय शिक्षण, पुण्याचे मेहेंदळे वैद्य, याजकडे झाले आणि बरेचसे शिक्षण त्यानी पिढीजात परंपरेवरून आणि जुन्या आयुर्वेदातील ग्रंथांवरून केले. त्यांची स्वत:ची चिकित्सक वृत्ती आणि संशोधनाने प्राप्त झालेले ज्ञान यामुळेच त्यांचे वैद्यकी ज्ञान पूर्णत्वास गेले. सुश्रुत, चरक, वाग्भट अशा जुन्या


सांगली आणि सांगलीकर...................................................... .६९