पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संपल्यासारखे आहेत. तथापि सांगलीच्या एका वैद्याला दाखवून मगच कोल्हापूरला परत जा.
 हा पैलवान महाराजांचा अत्यंत आवडता पैलवान होता. त्याच्यावर त्यानी खूप मेहनत घेतली होती. कुस्त्या मारून त्याने कोल्हापूरचा नावलौकिक वाढवावा, म्हणून त्याला उत्तम प्रतीचा खुराक चालू होता. त्याची अशी अवस्था झालेली बघून महाराज कष्टी झाले होते. शेवटचा अपाय म्हणून या वैद्याकडे आले होते. थोड्याच वेळात वैद्यराजानी महाराजाना आत बोलावले. दहा-पंधरा मिनिटे त्यानी पैलवानाची कसून तपासणी केली. मग ते महाराजांकडे वळून म्हणाले, “तुमचा पैलवान महिनाभरात अगदी खडखडीत बरा होईल." सर्वाना आश्चर्य वाटले. महाराजांचा तर विश्वासच बसेना. डॉ.व्हेलसारखा निष्णात डॉक्टर काय सांगतोय आणि हे वैद्यराज काय भाकित करत आहेत! अशीच त्यांच्या आणि अितरांच्याहि मनातील भावना होती.
 काही असो. एक महिन्याचे औषध घेऊन मंडळी कोल्हापूरला परतली. ज्याचे आयुष्य आठ-दहा दिवसाचे त्याच्यासाठी संपूर्ण महिन्याचे औषध कशाला ? असाच भाव सर्वांच्या चेहऱ्यावर होता.
 झाले. आठ दिवस झाले. दहा दिवस झाले. पैलवान काही मेला नाही! पंधरा दिवसानी महाराजांचा पी.ए, गाडी घेऊन घाबऱ्याघुबऱ्या कोल्हापूरहून सांगलीला वैद्यराजांकडे आला. त्याना सांगू लागला. तुम्हाला ताबडतोब येण्याची विनंती महाराजानी केली आहे. वैद्यबुवा म्हणाले, “अरे पण काय होतय ते तरी सांगशील किनई ?” मग पी. ए. आणि बरोबर आलेली मंडळी सांगू लागली की पैलवानाला एकसारख्या रक्ताच्या अलट्या होत आहेत. फार घाबरा झालाय तो. म्हणून महाराजानी आपल्याला यायची विनंती केलीय. वैद्यबुवा हसले. म्हणाले, "सांगा तुमच्या महाराजाना, म्हणावं, आता तुमचा पैलवान चांगला बरा होण्याच्या मार्गावर आहे." ती दरबारी मंडळी बुचकळ्यात पडली. पण त्यानी गयावया करून वैद्यबुवाना स्वत:च कोल्हापूरला चलण्याची विनंती केली. मग ते कोल्हापूरला गेले. रूग्ण तपासला. शाहू महाराज आणि त्यांचे डॉक्टर्स तिथं होतेच. वैद्यानी खुलासा केला "ज्याअर्थी आता नुसत्या रक्ताच्या अलट्या होत आहेत त्याअर्थी पू होण्याची क्रिया बंद झाली आहे. फुप्फुसातील विष आता पूर्णपणे पडून गेलंय. आता शुध्द रक्त होण्याची प्रक्रिया सुरू झालीय. आता तुमचा पैलवान खडखडीत बरा होणार !”

 आणि खरोखरीच महिनाभरात तो पैलवान चांगला बरा झाला. यमराजाच्या बगलेतच असलेल्या मृतवत् माणसाला, पुन्हा भूतलावरील माणसांमध्ये आणण्याची, किमया करणाऱ्या त्या धन्वंतरीचे नाव होते आबासाहेब सांबारे !


सांगली आणि सांगलीकर............................................................ ६८