पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सांगलीचे लोकविलक्षण धन्वंतरी
आबासाहेब सांबारे



 ७०-८० वर्षापूर्वीची गोष्ट.
 एक नामांकित वैद्य, आपल्या वाड्याच्या ऐसपैस ओसरीवर बसून, नेहमीप्रमाणे आपले रूग्ण तपासत होते. त्याना औषध देत होते. एवढ्यात बाहेरच्या दिंडी दरवाजापाशी मोठा गलका सुरू झाला. दोन-तीन हुजरे आले. "महाराज आले, महाराज आले,” असा पुकारा चालू होता. मग कळलं की महाराज म्हणजे कोणी साधासुधा राजा नव्हता. तो होता मोठा राजर्षी. प्रत्यक्ष कोल्हापूरचे शाहू महाराजच स्वत: वैद्यराजांच्या ओसरीवर आले होते. हे मोठं आक्रितच होतं. एवढा मोठा पैलवानी थाटाचा, सहा फुटी मर्द. त्याला काय कारण अिथं यायचं? पदरी डॉक्टरांची फौज असताना ? हुजऱ्या वैद्यराजांच्या कानाशी जाऊन सांगू लागला. “महाराज आल्याती. महाराज आल्याती.” त्याच्या कृतीचा अर्थ स्पष्ट होता. तो असा की वैद्यराजानी आता आपल्या नेहमीच्या रूग्णांना रजा द्यावी आणि फक्त महाराजांकडे लक्ष पुरवावं. पण वैद्यराज एकदम अखडले. त्याच्यावर डाफरले,"अरे,आले असतील तुझे महाराज, मला काय त्याचं? हे आधीपासून ताटकळत बसलेले रोगी तपासतो. मग तुझ्या महाराजाना बघतो.”
 हुजच्या चाट पडला. खरं म्हणजे घाबरलाच. बाहेर महाराजांची बग्गी अभी होती. त्याना सांगायचं कसं? त्यांचा असा अपमान? पण सांगणं तर भागच होतं. घाबरत घाबरत त्यानं सांगितलं. महाराज हसले. म्हणाले" हात्तिच्या, अवढंच ना? थांबू आपण."

 गोष्ट अशी होती की महाराज आपल्या पदरच्या गुलामञ्जुद्दीन नावाच्या पैलवानाला घेऊन आले होते. तो अगदी मरणोन्मुख अवस्थेत होता. त्याच्या फुप्फुसात पू झाला होता. कफ आणि खोकल्यातून पू येत असे. असं बरेच दिवस चाललं होतं. डॉक्टरांचे सर्व अपाय थकले. मिरजेच्या डॉ. वानलेसनंतर, त्यांच्याच तोलामोलाच्या आलेल्या प्रख्यात डॉ.व्हेलनी तपासून सांगितलं, की पैलवानाची तब्बेत अगदीच खालावलेली आहे. जास्तीत जास्त आठ ते दहा दिवस जगेल. आमचे अपाय आता


सांगली आणि सांगलीकर........................................................ .६७