पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होते. साधुदासांच्या शीघ्रकवित्वाचे कांही नमुने पुस्तकात सादर केले आहेत. 'काव्यविहारी' हे रविकिरण मंडळापूर्वीचे सांगलीतले प्रसिद्धी पावलेले कवी. ते केशवसुतांच्या प्रणालीतील समाजसुधारणाविषयक कविता करत. आचार्य अत्रे यांचा काव्यविहारींवर विशेष लोभ होता. राष्ट्रीय भावनेला आवाहन आणि सुबोध, ओघवती रचना हे त्यांच्या काव्याचे विशेष होते. बुधगावकर सरकारनी त्याना शिक्षणासाठी मदत केली आणि नंतर ते त्या संस्थानात न्यायदानाचे काम करीत राहिले. आपल्या काव्यशक्तीची जोपासनाही ते निष्ठेने करीत राहिले. त्यांची 'कलिका' ही कविता मनोरंजनच्या पहिल्या पानावर छापून आली तेव्हा ते हर्षभरित झाले. ‘काव्यविहार' व स्फूर्तिलहरी' हे त्यांचे काव्यसंग्रह रसिकमान्य झाले. त्या संग्रहांचा एम्. ए. च्या मराठी अभ्यासक्रमात समावेश झाला. नाटककार देवलांचे चरित्र आणि स्वतःचे आत्मचरित्र अशी त्यांची दोन गद्यसाहित्यातील पुस्तके. १९७५ साली काव्यविहारी निवर्तले.

 ज्ञानपीठ विजेते साहित्यिक विष्णु सखाराम खांडेकर हे देखील सांगलीचे सुपुत्र. सांगली येथे त्यांचा जन्म १८९८ साली झाला. त्यांचे घर गणपतीमंदिराजवळ होते आणि त्यांच्या जन्मदिवशी संकष्टी होती म्हणून त्यांचे नाव गणेश ठेवण्यात आले. ते दत्तक गेल्यावर त्यांचे नाव विष्णु सखाराम खांडेकर असे झाले. हे घराणे मूळचे कोकणातले. खांडेकरांचे शिक्षण सांगली हायस्कूलमध्ये झाले. तेथे त्यांनी उत्तम अभ्यास केला. त्याना स्कॉलरशिप मिळाली. पुढच्या शिक्षणासाठी पुण्यास फर्गसनला गेले. १९१४ साली त्यानी सांगली सोडली. ते कादंबरीकार, समीक्षक, चित्रपट कथालेखक झाले. अनेक मानसन्मान त्यांच्या वाट्याला आले. 'ज्ञानपीठ' पारितोषिकाने त्यावर कळस चढविला.

 धनी वेलणकर हे सांगलीचे स्वतंत्र बाण्याचे, कल्पक उद्योगपती. त्यांनी प्रसिद्ध गजानन मिलची स्थापना करुन सांगलीत उद्योगांची मुहूर्तमेढ उभी केली. त्यांचे आयुष्य विविध कसोट्या देण्यात खर्च झाले. मेहनतीने उभी केलेली गजानन मिल गांधीहत्येनंतर आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. वेलणकरानी धीर सोडला नाही. एका वर्षापूर्वीच त्यांची सुवर्णतुला थाटामाटात साजरी झालेली होती. त्यानी मिलची पुन्हा उभारणी केली. वेलणकरांनी आयुष्याची सुरवात चार आणे मजुरीवर केली होती. लहानपणी व्यायाम करुन त्यानी कुस्त्या मारल्या होत्या. त्यानी नेहमीचे शिक्षण सोडून बडोद्यात विणकामाचे शिक्षण घेतले. ते टिळकभक्त होते. टिळकानी महाराष्ट्रीयन तरुणानी उद्योगधंदे उभारावेत असा संदेश दिलेला होता. त्याला अनुसरुन वेलणकरांनी स्वतंत्र उद्योग सुरु

पाच