पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजीराव गायकवाड यांच्या सूचनेवरुन लिहिले गेलेले 'संशयकल्लोळ आणि ते रंगभूमीवर येण्यापूर्वीच देवलांचा घडलेला मृत्यू यांचा प्रत्ययकारी आलेख लेखकाने काढला आहे.

 त्यांचप्रमाणे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांच्या बहुविध साहित्यसेवेचा, स्वाभिमानी वृत्तीचा, मान्यवरांशी घडलेल्या त्यांच्या सहवासाचा, 'केसरी' मधली त्यांची संस्मरणीय कारकीर्द, त्यांच्या प्रक्षोभक लेखामुळे लोकमान्य टिळकाना घडलेला तुरुंगवास, टिळकांच्या लेखनाची त्यानी आत्मसात केलेली शैली, क्रांतिकारी चळवळीतली त्यांची कामगिरी, नेपाळमध्ये घालवलेले दिवस, गंधर्व नाटक मंडळीसाठी त्यानी लिहिलेली नाटके, टिळकांचा मंडालेतील कारावास, केसरीशी संबंध संपणे, लोकमान्यांच्या सुटकेनंतर त्यानी पुन्हा केसरीत रुजू होणे, टिळकांचा १८२० साली झालेला मृत्यू, खाडिलकरांचे ट्रस्टीचे पद जाणे, लोकमान्य, नवाकाळ या वृत्तपत्रांची सुरवात, गांधीजीच्या राजकारणास पाठिंबा, १९२९ साली ‘राजद्रोहाचा खटला, तुरुंगवास, प्रकृती खालावणे, त्यांची अखेरची नाटके न चालणे, हा सर्व प्रवास श्री अविनाश टिळकांनी ठळकपणे उलगडला आहे. ज्या स्वातंत्र्याप्राप्तीसाठी कै. खाडिलकरांनी आपली लेखणी झिजवली ते त्याना पाहता आले. १९४८ साली त्यांचे देहावसान झाले.

 संत कोटणीस महाराजांच्यामुळे सांगलीला कीर्तनपंढरी म्हणून ओळखले जाऊ लागले. गुरुदेव रानडे त्याना आधुनिक एकनाथ म्हणत. त्यांच्या जीवनाची रूपरेषा लेखकाने मांडली आहे. त्यांच्या परमार्थसाधनेतील आणि व्यवसायातील चढउतार नमूद केले आहेत. त्यांच्या कीर्तनाची वैशिष्टये सांगितली आहेत. फार आस्थेवाईकपणे व सविस्तर अशी ही हकीगत आली आहे.

 आबासाहेब सांबारे हे लोकविलक्षण धन्वंतरी. कोल्हापूरच्या महाराजांना प्रतीक्षा करायला लावणारे आणि त्यांच्या पैलवानाला मरणाच्या दारातून परत आणणारे. त्या काळात आबासाहेब एक वैद्यकीय दंतकथा बनले होते. त्यांच्या गणपती उत्सवाचे महात्म्यही लेखकाने वर्णन केले आहे. आपल्या औषधोपचारांनी अल्लादिया खाँसाहेबांचा आवाज कसा पूर्ववत करुन दिला याची विस्मयकारक घटना लेखकाने रोचकपद्धतीने वर्णन केली आहे. लोकमान्यांपर्यंत त्यांची कीर्ती पोहचली होती. दुसरे असले विलक्षण व्यक्तिमत्व कवी साधुदासांचे. शीघ्रकवित्वाचे देणे लाभलेले ते संस्थानचे राजकवी होते, बुद्धिबळपटू होते. उत्तर पेशवाईच्या काळावर त्यानी उत्तम ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या. संस्कृतवर त्यांचे प्रभुत्व होते. राजवैद्य आबासाहेब सांबारे व कोटणीस महाराज हे त्यांचे जवळचे स्नेही

चार